१०० रुपयांसाठी दोघांचा खून

By Admin | Updated: April 22, 2016 04:46 IST2016-04-22T04:46:52+5:302016-04-22T04:46:52+5:30

जेवणासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरू युवकाने दोघांचा निघृन खून केला. अर्ध्या तासाच्या आत हे

2K blood for Rs 100 | १०० रुपयांसाठी दोघांचा खून

१०० रुपयांसाठी दोघांचा खून

नागपूर : जेवणासाठी १०० रुपये दिले नाही म्हणून एका माथेफिरू युवकाने दोघांचा निघृन खून केला. अर्ध्या तासाच्या आत हे दोन्ही खून करण्यात आले. ही घटना अमरावती रोडवरील वाडी येथे घडली. माथेफिरू आरोपीला पोलिसांनी अटक केली. ज्ञानेश्वर ऊर्फ नाना बंडू राठोड (२४) रा. पुसागोंदी, मोठा तांडा, ता. काटोल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शामराव वामनराव खाडे (४७), रा. शिवाजीनगर, दखने मोहल्ला, वाडी व ओम अमृत गिरी (३५), रा. सहकारनगर, बुलडाणा अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर हा सराईत गुन्हेगार आहे.
त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. चोरीच्या एका प्रकरणात त्याला शिक्षाही झाली आहे. गुन्हे शाखेचे प्रभारी डीआयजी रंजन कुमार शर्मा आणि झोन एकचे डीसीपी शैलेश बलकवडे यांनी घटनेची माहिती दिली. बलकवडे यांनी सांगितले की, बुधवारी रात्री १.३० वाजता वाडी नाक्यावरील पेट्रोल पंपासमोरील मंदिराजवळ श्यामराव खाडे यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर काठीने वार केल्यानंतर चेहरा दगडाने ठेचला होता. मृतदेहाजवळच काठी पडलेली होती.
मृतदेहाची अवस्था पाहून काही वेळापूर्वीच खून झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीचा शोध घेत असतानाच पेट्रोल पंपापासून ७०० मीटर अंतरावर ओम गिरी नावाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याचेही डोके दगडाने ठेचलेले होते. एकाच रात्री दोघांचा दगडाने ठेचून खून झाल्याने पोलीसही हादरून गेले. पोलिसांनी कॉम्बिंग आपरेशन राबविले. रस्त्यावर फिरणाऱ्या नशेखोरांना पकडणे सुरू केले. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पकडून आणले. आरोपीचा शोध घेत असतानाच आरोपी ज्ञानेश्वर हा एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झोपलेला दिसून आला. त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते.

सराईत गुन्हेगार : ज्ञानेश्वर राठोड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात काही पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो रात्री बेरात्री कुठेही फिरत असून, चोरी व घरफोड्या करतो. एवढेच नव्हे तर, नागरिकांना विनाकारण धमकावणे, त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही त्याने केले आहेत. त्यामुळे त्याला एका गुन्ह्यात न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा पूर्ण करून तो महिनाभरापूर्वी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्याकडून अन्य गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सायको
प्रोफाईलचा शोध
पोलीस ज्ञानेश्वरच्या वैद्यकीय तपासणीसोबतच सायको प्रोफाईलची तपासणीही करणार आहे. या माध्यमातून त्याच्या मानसिक अवस्थेचा पत्ता लावण्यात येईल. प्राथमिक तपासात तो रागीट स्वभावाचा गुन्हेगार असल्याचे दिसून येते. १०० रुपये दिले नाही म्हणून त्याने दोन्ही खून केल्याचे सांगत आहे. परंतु सखोल तपास केला असता लुटपाट करताना विरोध केला म्हणूनच खून झाल्याचे आढळून येते.

Web Title: 2K blood for Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.