२९ दलालांचे परवाने रद्द

By Admin | Updated: April 30, 2016 03:07 IST2016-04-30T03:07:48+5:302016-04-30T03:07:48+5:30

शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो.

29 licenses canceled | २९ दलालांचे परवाने रद्द

२९ दलालांचे परवाने रद्द

शेतकऱ्यांकडून सेस वसुली सुरूच : भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोध
बाबा टेकाडे सावनेर
शहरातील ठोक भाजीबाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत नसून, तो शहरातील मध्यवस्तीत भरतो. या बाजारात कार्यरत असलेल्या २९ दलालांनी बाजार समितीच्या नियमांचे पालन न करता त्यांचे परवान्यांचे नियोजित काळात नूतनीकरण केले नाही. परिणामी, या सर्वांचे परवाने बाजार समिती प्रशासनाने रद्द केले आहे. तरीही सदर दलाल शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
या भाजीबाजारात एकूण २९ दलाल कार्यरत आहेत. त्या सर्वांना पणन संचालनालयाच्या नियम व अटींना आधीन राहून बाजार समिती प्रशासनाने दलालीचे परवाने अदा केले होते. या सर्वांच्या परवान्यांची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. सदर दलाल बाजार समितीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करीत असल्याने बाजार समिती प्रशासनाने कुणाच्याही परवान्याचे नूतनीकरण केले नाही. परिणामी, या दलालांना बाजारात दलाली करण्याचा कोणताही अधिकार राहिला नाही. तरीही हे दलाल मनमानी करीत शेतकऱ्यांकडून वाजवीपेक्षा अधिक सेस वसूल करीत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.
वास्तवात, या दलालांवर कुणाचाही अंकुश नसल्याने ते बाजार समितीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने या दलालांना वारंवार स्मरणपत्र देऊन बजावले तरीही, उपयोग झाला नाही. परिणामी, दलाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरेदी-विक्रीचा व्यवसाय करायला तयार नाही. दुसरीकडे, हा भाजीबाजार शहराच्या मध्यभागी असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत असल्याने या दलालांनी त्यांचा हा व्यवहार मार्कट यार्डात करण्याच्या भूमिकेवर बाजार समिती ठाम आहे.
सावनेर शहरातील ठोक भाजीबाजार स्थानांतरणाला दलालांचा विरोध आहे. बाजार समिती व दलाल यांच्या लढाईत शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, स्थानिक नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. दलालांनी बाजार समितीच्या नियमानुसार त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करवून घेतल्यास तसेच नियमानुसार व्यवसाय केल्यास सर्वांच्या सोयीचे ठरणार आहे. दलाल मनमानी करीत असल्याने त्यांनी भाजीबाजारात केलेले अतिक्रमण नगर परिषद प्रशासनाने हटवावे. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्याशिवाय या भाजीबाजाराचे स्थानांतरण होणार नाही, अशा प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केल्या.

Web Title: 29 licenses canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.