संपामुळे बँकांचे २८०० कोटींचे व्यवहार ठप्प 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 01:11 AM2021-03-16T01:11:03+5:302021-03-16T01:12:47+5:30

Bank employees strike केंद्र शासनाचे बँकविरोधी धोरण आणि दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोनदिवसीय संपाला सुरुवात केली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यात २८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे.

2,800 crore transactions stalled due to Bank employees strike | संपामुळे बँकांचे २८०० कोटींचे व्यवहार ठप्प 

संपामुळे बँकांचे २८०० कोटींचे व्यवहार ठप्प 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात १२५०० कर्मचारी संपावर : खासगीकरणाचा कर्मचाऱ्यांनी केला विरोध

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : केंद्र शासनाचे बँकविरोधी धोरण आणि दोन राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोनदिवसीय संपाला सुरुवात केली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी नागपूर जिल्ह्यात २८०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे बँक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट करून संपाचे समर्थन केले.

संपात नागपूर जिल्ह्यातील विविध बँकांच्या ३३० पेक्षा अधिक शाखांमधील १२५०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला, असे ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे यांनी सांगितले. संपात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली नऊ संघटनांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडिया आणि सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँकेसमोर खासगीकरणाचा विरोध केला.

यावेळी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे पदाधिकारी राकेश बंगाले, वीरेंद्र गेडाम, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स नागपूर चॅप्टरचे सहसंयोजक सुरेश बोभाटे, ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव जयवंत गुर्वे उपस्थित होते. कामगार नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खासगीकरणाच्या मुद्द्‌यावर एकजूट राखण्याचे आवाहन केले.

दोन दिवसांच्या संपात सहकारी आणि खासगी बँका सहभागी झाल्या नसून लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन, धरणे आंदोलन न करता, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला विरोध प्रकट केल्याचे विदर्भ बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे व्यवस्थापकीय सचिव सुरेश चौधरी यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवार, रविवार बँका बंद असल्यामुळे आणि सोमवार, मंगळवार संप असल्यामुळे शहरातील बहुतांश भागातील एटीएम रिकामी झाली.

१७ व १८ रोजी विमा कर्मचारी संपावर

 दोन दिवसांच्या या संपानंतर १७ मार्चला जनरल इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच १८ मार्चला एलआयसीचे कर्मचारी आणि अधिकारीही एलआयसी, जीआयसीच्या खासगीकरणाविरुद्ध संप पुकारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

असा राहिला संप...

 जिल्ह्यातील ३३० शाखांतील १२५०० कर्मचारी संपावर

 बँकिंग क्षेत्रातील ९ संघटनांचा संपात समावेश

 २८०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

 कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला केला विरोध

 सहकारी, खासगी बँकांचा संपात सहभाग नाही

 लॉकडाऊनमुळे बँक कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन, धरणे आंदोलन टाळले

 सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला संपाला पाठिंबा

 संपामुळे शहराच्या बहुतांश भागातील एटीएम झाली रिकामी.

Web Title: 2,800 crore transactions stalled due to Bank employees strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.