दुप्पट रक्कमेच्या हव्यासापोटी २८ लाख बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:24+5:302021-06-24T04:07:24+5:30
नागपूर : २४ महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम परत करण्याची बतावणी करून २८ लाखाने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सोनेगाव ...

दुप्पट रक्कमेच्या हव्यासापोटी २८ लाख बुडाले
नागपूर : २४ महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम परत करण्याची बतावणी करून २८ लाखाने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सोनेगाव पोलिसांनी पुणे आणि चंद्रपूरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संदीप बागुल, त्याची पत्नी कल्पना बागुल, राजेंद्र जाधव, संतोष सिंगनाथ पुणे आणि सुभाष घोगरे चंद्रपूर अशी आरोपींची नावे आहेत. झेंडा चौक सोमलवाडा येथील आनंदराव रघटाटे (६१) वाहन चालक आहेत. त्यांची २०१७ मध्ये सुभाष घोगरेशी ओळख झाली. घोगरे मसाला कंपनीत काम करीत होता. त्याने रघटाटे यांना सेव्हन ड्रीम नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास २४ महिन्यात दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखविले. घोगरेने रघटाटे यांची इतर आरोपींशी ओळख करुन दिली. घोगरेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रघटाटे यांनी गुंतवणूक केली. घोगरे आणि इतर आरोपींनी रघटाटे यांना सांगितले की, त्यांना फूड सप्लीमेंटच्या बॉटलचे पेमेंट करावयाचे आहे. त्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून रघटाटे यांनी आपल्या ओळखीच्या नागरिकांना गुंतवणूक करण्यासाठी तयार केले. रघटाटे आणि त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींनी ४८ लाखाची गुंतवणूक केली. निर्धारीत वेळ झाल्यानंतर गुंतवणूकदार पैसे परत मागू लागले. आरोपींवर दबाव टाकल्यानंतर त्यांनी काही रक्कम परत दिली. उर्वरीत २८.३२ लाख रुपये परत करण्यासाठी ते टाळाटाळ करीत होते. रघटाटे यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक, गुन्हेगारी कृत्य आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
.............