२८९ गावांना एसटीची प्रतीक्षा!

By Admin | Updated: May 5, 2016 02:53 IST2016-05-05T02:53:35+5:302016-05-05T02:53:35+5:30

महाराष्ट्राची उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे.

28 9 villages waiting ST! | २८९ गावांना एसटीची प्रतीक्षा!

२८९ गावांना एसटीची प्रतीक्षा!

नागपूर जिल्ह्यातील वास्तव : रस्ते आहेत; पण एसटी आहे तरी कुठे?
गणेश खवसे नागपूर
महाराष्ट्राची उपराजधानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा अशी नागपूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र याच नागपूर जिल्ह्यातील तब्बल २८९ गावांना स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही एसटी महामंडळाच्या बसने दर्शन दिले नाही. ‘रस्ता तिथे एसटी’ असे ब्रीदवाक्य घेऊन मिरविणाऱ्या एसटी महामंडळाचे धक्कादायक वास्तव या स्थितीमुळे समोर येते. गावापर्यंत जाण्यासाठी डांबरीकरण असले तरी बसफेरी सुरू न झाल्याने ग्रामस्थांची पायपीट कित्येक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, आदिवासीबहुल देवलापार (ता. रामटेक) भागातील नागरिकांना कोणत्याही कामासाठी गावाबाहेर जायचे असल्यास ८ते १२ किमीपर्यंतचे अंतर पायी जावे लागते.

‘गाव तिथे रस्ता’ असे विकासाचे जाळे भारतात तयार करण्यात आले. याच तत्त्वावर ‘रस्ता तिथे एसटी’ असे ब्रीदवाक्य तयार करून एसटी महामंडळाने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ वाहतुकीचे जाळे विणण्याचे काम केले.
सुरुवातीच्या काळात गिट्टीचे रस्ते असले तरी बहुतांश गावांना जोडण्याचे काम एसटी महामंडळाने बसच्या माध्यमातून केले. विशेषत: मुख्य रस्त्यावर आणि या रस्त्यापासून फाटा फुटलेल्या सात किमीपेक्षा जास्त अंतरावरील गावांना एसटी बसने दळवळणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. परंतु असे असले तरी स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही कित्येक गावांत एसटी बस सुरू झालेली नाही. किंबहुना या गावांना एसटी बसने दर्शन दिले नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पायपीट करण्याशिवाय पर्याय नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर या गृहजिल्ह्यातील तब्बल २८९ गावांमध्ये एसटी बसने अद्याप दर्शन दिले नाही. त्यामध्ये मौदा तालुक्यातील सर्वाधिक ४९ गावांपर्यंत एसटी बस पोहोचू शकली नाही. त्याखालोखाल कुही तालुक्यातील ४८, कामठी तालुक्यातील गावांची संख्या ३४ आहे.
कळमेश्वर तालुक्यातील ३० गावांमध्ये एसटी बस पोहोचलेली नाही. रामटेक तालुक्यातील २७ गावांमध्ये एसटी बस पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे, ही २७ गावे आदिवासीबहुल आहेत. या सर्व गावांना कच्च्या - पक्क्या (गिट्टी-डांबरी) रस्त्याने जोडले आहेत. मात्र एसटी बसने या गावांना जोडलेले नसल्याने ग्रामस्थांची परवड थांबलेली नाही. विशेष म्हणजे, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेले कामठी आणि मौदा हे दोन्ही तालुके पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघांतर्गत येतात. त्यामुळे आता या गावांमध्ये बसफेरी सुरू करण्यासाठी, ते काही प्रयत्न करतात, का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

आगारात नाही माहिती
नागपूर जिल्ह्यातील किती गावांमध्ये एसटी बस जात नाही, हे वास्तवचित्र जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने एसटी महामंडळाच्या आगाराशी संपर्क साधला. मात्र किती गावांमध्ये एसटी जाते, एवढीच त्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे. किती गावांमध्ये एसटी बस जात नाही, ही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, उमरेड आगाराशी संपर्क साधला असता तेथील कालोकर नामक महिला कर्मचाऱ्याने ‘साहेब, बाहेर गेले आहेत. साहेब पेट्रोलटँकजवळ आहेत. साहेब चौकशी विभागात आहेत’ अशी वेगवेगळी उत्तरे देत टोलवाटोलवी केली. वारंवार संपर्क साधल्यानंतरही उमरेड आगाराचे आगार व्यवस्थापक विलास एस. पाध्ये यांच्यापर्यंत माहिती पोहचली नाही.

Web Title: 28 9 villages waiting ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.