नागपूर मेडिकलच्या सोलर प्रकल्पासाठी २७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 22:31 IST2019-01-04T22:30:26+5:302019-01-04T22:31:30+5:30
सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली.

नागपूर मेडिकलच्या सोलर प्रकल्पासाठी २७ कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सौर ऊर्जा प्रकल्प आज काळाची गरज आहे. शासकीय रुग्णालयांना त्यांचा खर्च पाहता, विजेचा खर्च परवडणारा नाही. २४ तास कमी खर्चात वीज उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ४.५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा (सोलर) प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी २७ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिली.
मेडिकलच्या क्षय व ऊररोग विभागाच्यावतीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ‘स्लीप’ व ‘एनआयव्ही’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, इंग्लड येथील रॉयल कॉलेजचे प्राध्यापक व छाती तज्ज्ञ डॉ. मिलिंद सोवानी, लखनौ येथील ज्येष्ठ छातीरोग तज्ज्ञ डॉ. एस.एन. गुप्ता व विभागप्रमुख डॉ. सुशांत मेश्राम उपस्थित होते.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, सोलर प्रकल्प उभारून सौर ऊर्जेद्वारे विजेचे उत्पादन जास्तीतजास्त केल्यास वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी होऊन प्रदूषण कमी होते. ऊर्जेची कमतरता भासणार नाही. मेडिकलच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारला जाईल, यासाठी मेडिकल प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. छाती रोग विभागाचे अद्यावतीकरण व यंत्रसामुग्रीसाठी पाच कोटी रुपयांचाही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले.
मेडिकल सर्वाेत्कृष्ट संस्था व्हावी -डॉ. निसवाडे
मेडिकलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ट्रॉमा केअर सेंटर, प्रत्यारोपण सेंटर रुग्णसेवेत आहे. याचा मोठा फायदा रुग्णांना होत आहे. लवकरच रोबोटिक सर्जरी विभाग, स्पाईन सेंटर, कॅन्सर हॉस्पिटल, लंग इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहे. मेडिकल ही संस्था देशातील नव्हे तर जगातील सर्वाेत्कृष्ट संस्था व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे, असे प्रतिपादन डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी येथे केले.