स्टील प्लॅन्टवर २७ कोटींची जप्ती
By Admin | Updated: June 27, 2014 00:31 IST2014-06-27T00:31:34+5:302014-06-27T00:31:34+5:30
उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट नाही, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, उत्पादन शुल्काचा भरणा न करणे या कारणांखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने येथील एमईएल स्टिल प्लँटवर जप्तीची

स्टील प्लॅन्टवर २७ कोटींची जप्ती
चंद्रपूर: उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट नाही, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, उत्पादन शुल्काचा भरणा न करणे या कारणांखाली केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने येथील एमईएल स्टिल प्लँटवर जप्तीची कारवाई करुन सुमारे २७ कोटींचे साहित्य जप्त केल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.
चंद्रपूर-मूल मार्गावर महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट लिमिटेड हा स्टिल कारखाना आहे. २३ जून रोजी एमईएलमधून ११ ओव्हरलोड ट्रक भिलाईकडे रवाना झाले. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हे ट्रक मूलजवळ पकडले. साहित्य व कागदपत्रांची चौकशी केली असता ट्रकमधून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. शिवाय कोणतेही कागदपत्र समाधानकारक असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे हे ११ ट्रक जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या हे अकराही ट्रक मूल येथील पृथ्वी फेरो अलाईन्ससमोर उभे करण्यात आले आहेत.
या कारवाईनंतर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखान्यावर धाड टाकली. तेव्हा व्यवस्थापनाने सहा महिन्यांपासून उत्पादित मालाचा दैनंदिन रिपोर्ट अद्ययावत ठेवला नसल्याचे आढळून आले. याशिवाय उत्पादन शुल्कही नियमित भरले नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारखान्यावर जप्तीची कारवाई करीत २७ कोटींचे साहित्य जप्त केले. या प्रकरणाची केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने कसून चौकशी सुरू केली असून यात अनेक बडे अधिकारी गळाला लागण्याची शक्यता आहे. याबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी या कारवाईला दुजोरा दिला. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने ट्रक जप्त केले. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.(शहर प्रतिनिधी)