नागपुरात तीन दिवसात २६ जणांना सक्तीचा एकांतवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 22:23 IST2020-03-18T22:22:41+5:302020-03-18T22:23:21+5:30
आज बुधवारी १४ प्रवाशांना तर मागील तीन दिवसात अशा २६ प्रवाशांना विमानतळावरून थेट आमदार निवासात नेण्यात आले आहे.

नागपुरात तीन दिवसात २६ जणांना सक्तीचा एकांतवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची भीती नागपुरातही वाढली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार परदेशातून प्रवास करून शहरात येणाऱ्या सर्वांची तपासणी केली जात असून अशा प्रवाशांना सक्तीची विश्रांती दिली जात आहे. या प्रवाशांना १४ दिवस सर्वांपासून वेगळे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रवाशांची राहण्याची व्यवस्था आमदार निवासात करण्यात आली आहे. आज बुधवारी १४ प्रवाशांना तर मागील तीन दिवसात अशा २६ प्रवाशांना विमानतळावरून थेट आमदार निवासात नेण्यात आले आहे.
ज्या दहा देशांमध्ये कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे तेथून आलेल्या नागपूरकरांना लक्षणे असो वा नसो सक्तीने १४ दिवसांचा एकांतवास आणि विश्रांती दिली जात आहे. कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनातर्फे दररोज नवनवे उपक्रम राबवून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच सध्या त्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे विदेशातून नागपुरात परतणाºया लोकांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. भारताने दहा देशांमधून आलेल्या प्रवाशांना विशेषत्वाने तपासण्याचे व त्यांच्यावर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या दहा देशांतून प्रवास करून येणाºया प्रवाशांची यादी केंद्र सरकार विमानतळ प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाला पाठविते. आता ही तपासणी अधिक कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहा देशांतून आलेल्या व्यक्तीला लक्षणे दिसत असो अथवा नसो; त्यांना १४ दिवसांचा एकांतवास बंधनकारक करण्यात आला असून विमानतळावर उतरलेले प्रवासी थेट आमदार निवासात नेले जात आहेत. येथे त्यांच्या जेवणापासूनची सर्व व्यवस्था शासनातर्फे केली जात आहे.
आणखी तीन देशांची भर
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया, स्पेन आणि फ्रान्स या सात देशांमधून आलेल्यांना सक्तीच्या एकांतवासात ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. कोरोनाचा वाढता व्याप लक्षात घेता आखाती देशांमधील आणखी तीन देशांचा यात समावेश करण्यात आला आहे. यात आखाती देशांतील दोहा, दुबई आणि कतारचा समावेश करण्यात आला आहे.
आमदार निवासातील २१० खोल्या घेतल्या ताब्यात
सुमारे दीड हजार नागरिकांची १४ दिवस कालावधीसाठी वास्तव्याची सुविधा करण्यासाठी आमदार निवाससह शासकीय व इतर इमारतीमध्ये विलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे. त्यात आमदार निवास येथे २१० खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे व्यक्ती राहू शकतील अशी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी बुधवारी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूसंदर्भात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, विक्रम साळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र्र पातुरकर आदी उपस्थित होते.
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार सातत्याने होत असून यावर दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत. कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस अलगीकरण केंद्रात (क्वारेन्टाईन सेंटर) राहणे बंधनकारक आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दररोज येणाºया आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना क्वारेन्टाईन केंद्रात आणण्याची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
नागभवन-वनामतीही घेणार
आमदार निवासमधील २१० खोल्या सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात सुमारे एक हजार प्रवासी विदेशातून येतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आमदार निवासाखेरीज वनामती आणि नागभवन परिसरातील काही खोल्या ताब्यात घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी चांगली स्वच्छता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.