२५९ अतिक्रमणाचा सफाया, ३ ट्रक साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:27+5:302021-03-04T04:13:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी शहरातील २५९ ...

२५९ अतिक्रमणाचा सफाया, ३ ट्रक साहित्य जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेने शहरातील रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी शहरातील २५९ अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला. यादरम्यान पथकाने आठ दुकानाचे बांधकाम तोडून तीन ट्रक साहित्य जप्त केले.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार शहरात अतिक्रमण कारवाई होत आहे. बुधवारी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत खामला चौकातील भाजीपाला विक्रेते, ठेलेवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. खामला चौक ते जयप्रकाशनगर ते छत्रपती चौक ते अजनी चौक ते चुनाभट्टी रस्त्याच्या बाजूचे ४२ अतिक्रमण काढून एक ट्रक साहित्य जप्त केले.
धरमपेठ झोनच्या पथकाने उत्तर अंबाझरी रोड ते व्हीआयपी रोडच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटवून परिसर माेकळा करण्यात आला. हनुमाननगर झोनच्या पथकाने तुकडोजी पुतळा ते छोटा ताजबाग ते सक्करदरा चौक ते बुधवार बाजार ते गजानन चौक परिसरातील ३८ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त केले.
धंतोली झोनक्षेत्रात मनीषनगर येथे भरणारा बुधवार बाजार हटविला. येथील ३० अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी तलाव परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. या भागातील २९ अतिक्रमण काढण्यात आले.
गांधीबाग झोन भागातील सेंट्रल एव्हेन्यू रोड ते बडकस चौक दरम्यानच्या मार्गावरील अतिक्रमण हटविले. पथकाने अभिमन्यू चावला, विजय केवलरामानी, विजय वैद्य, राम शर्मा, राधादेवी प्रेमलानी, रमेश सोमाणी, कृष्णा बिनेकर आदींनी अतिक्रमण करून केलेले बांधकाम जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सतरंजीपुरा झोनअंतर्गत शांतिनगर येथे बुधवारी भरणारा आठवडी बाजार हटविण्यात आला. यावेळी ३६ अतिक्रमण हटविण्यात आले. लकडगंज झोनमधील छाप्रूनगर चौक ते आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक ते शिवाजी चौक, वर्धमाननगर आदी भागात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ३१ अतिक्रमण हटवून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.
मंगळवारी झोन क्षेत्रातील जरीपटका रोड ते काद्री चौक परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. या भागातील ४४ अतिक्रमण हटवून १२०० रुपये दंड वसूल करण्यात आला.