मंत्र्यांच्या आश्वासनावर २५ लाखांचा खर्च
By Admin | Updated: July 5, 2014 02:12 IST2014-07-05T02:12:05+5:302014-07-05T02:12:05+5:30
वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘कॉफी विथ स्टुडंट्स’मध्ये दिलेल्या पहिल्या टप्प्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ..

मंत्र्यांच्या आश्वासनावर २५ लाखांचा खर्च
नागपूर : वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘कॉफी विथ स्टुडंट्स’मध्ये दिलेल्या पहिल्या टप्प्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी २५-३० लाखांचा खर्च स्वत: मेडिकल प्रशासन उचलत आहे. यातून विद्यार्थ्यांना येत्या काही दिवसांत ‘वायफाय’, ‘जिम’, ‘टाटा स्कायचे कनेक्शन’, ओटीपीटीच्या विभागासाठी बेंचेस, बोर्ड, ६० नवीन खाटा लवकरच उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या खर्चाला घेऊन भाविष्यात प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
‘कॉफी विथ स्टुडंट्स’ उपक्रमाला आठवडा पूर्ण झाला आहे. त्यानिमित्त मेडिकल प्रशासनाने कोणकोणती कामे मार्गाला लागलेली आहेत, याची माहिती सादर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी पाच लाख रुपयांच्या जिमचे साहित्य लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवडाभरात बीएसएनएल कंपनीचे वायफाय मार्डच्या हॉस्टेलमध्ये लागणार आहे. ओटीपीटी विभागासाठी स्वतंत्र इमारत आहे, परंतु येथे बेंचेस, खुर्च्या व बोर्ड नव्हते. आता येथे हे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना ६० नवीन बेड आणि रीडिंग रूममध्ये टेबल आणि खुर्च्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी मेडिकल प्रशासनाने बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मेडिकलचा मोठा निधी खर्च होत आहे.
हा सर्व खर्च स्थानिक पातळीवर होत असल्याने भविष्यात यावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चर्चा आहे. दुसरीकडे रुग्णांच्या सोयीकडे मेडिकल प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही होत आहे. (प्रतिनिधी)