एमआरआय, आयसीयूकरिता २५ कोटींचा प्रस्ताव : पालकमंत्री यांनी घेतला मेडिकलचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:00 IST2019-08-06T21:59:07+5:302019-08-06T22:00:48+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना मंगळवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

मेडिकलच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सोबत अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता डॉ. अशोक मदान व इतर विभाग प्रमुख.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकच ‘एमआरआय’ यंत्र असल्याने रुग्णांना एक ते दीड महिन्यांची प्रतीक्षेची वेळ येते. यामुळे आणखी एका एमआरआयसाठी १५ कोटी तर ‘पेडियाट्रिक सर्जरी’ विभागासाठी २५ कोटींचा प्रस्ताव अधिष्ठात्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना मंगळवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
जिल्ह्यात झालेल्या आरोग्य शिबिरातील गरजू रुग्णांवरील प्रलंबित शस्त्रक्रिया व मेडिकलचा आढावा पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. यावेळी आ. पंकज भोयर, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
१२४० शस्त्रक्रिया दोन महिन्यात करा
मेडिकलच्यावतीने जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये शेकडो रुग्णांनी हजेरी लावली. यातील ५० टक्क्यांवर रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडल्या. परंतु अद्यापही विविध विभागांतर्गत येणाऱ्या १२४० शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. याचा आढावाही पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतला. १५ सप्टेंबरपर्यंत या शस्त्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिष्ठात्यांना दिला.
सर्वाधिक शस्त्रक्रिया नेत्ररोग विभागाच्या
प्रलंबित शस्त्रक्रियांमध्ये नेत्ररोग विभागाच्या ७४४ शस्त्रक्रिया आहेत. त्यानंतर जनरल सर्जरी विभागाच्या १३३, यूरोलॉजी विभागाच्या १११, अस्थिव्यंगोपचार विभागांतर्गत हिप जॉईंटच्या ७७, नी रिप्लेसमेंटच्या ४८, स्पाईनच्या ५७ तर स्त्रीरोग व प्रसूती विभागाचा ७० शस्त्रक्रिया प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यातील जे रुग्ण ‘बीपीएल’ योजनेंतर्गत येतात त्यांच्यावर नि:शुल्क आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
बालरोग शस्त्रक्रियेसाठी यंत्रसामुग्री
मेडिकलमधील ‘एमसीएच’ ‘पेडियाट्रिक सर्जरी’ला यावर्षी ‘एमसीआय’ने दोन जागांना मंजुरी दिली. यामुळे आता या अभ्यासक्रमाचा मार्ग मोकळा झाला आहे. आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी २५ कोटींचा प्रस्तावही यावेळी पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आला. त्यांनी तातडीने हा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
‘मॅटर्निटी अॅण्ड चाईल्ड हेल्थ केअर’साठी स्वतंत्र इमारत
बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीप्ती जैन, स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे प्रमुख डॉ. फिदवी यांनी ‘मॅटर्निटी अॅण्ड चाईल्ड हेल्थ केअर’ म्हणजे स्त्रीरोग व प्रसूती विभाग आणि बालरोग विभागाचे संयुक्त अतिदक्षता विभागाची इमारतीची गरज असण्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. मेडिकलमध्ये दरवर्षी १५ हजार प्रसूती होतात. यात गंभीर होणाऱ्या माता व बालकांसाठी स्वतंत्र अतिदक्षता विभागाची आवश्यकता असल्याची त्यांनी मागणी केली. यासंदर्भातील प्रस्ताव
हाफकिन्सकडे ६० कोटी थकीत
मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील यंत्रसामुग्रीचे ६० कोटी रुपये हाफकिन्सकडे थकीत आहेत. यातील केवळ तीन कोटी रुपयांचे १३ व्हेंटिलेटर, सेंट्रल मॉनिटर व ‘डीआर’ यंत्र उपलब्ध आहे. याला घेऊन पालकमंत्री बावनकुळे यांनी त्याचवेळी मोबाईलद्वारे हाफकिन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जाब विचारला व त्वरित यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा सूचनाही केल्याचे समजते.
सौर ऊर्जेवर मेडिकल
मेडिकलचे विजेचे बिल दर महिन्याला ४५ लाख रुपयांपर्यंत येते. वर्षाला अडीच कोटी रुपये वीजबिलापोटी खर्च करावे लागते. यावर उपाय म्हणून संपूर्ण मेडिकल कॉलेज सौर ऊर्जेवर घेण्याचा प्रस्ताव पालकमंत्र्यांनी तयार करण्याच्या सूचना महाऊर्जाला दिल्या.