२४८ प्रवाशांनी केला ‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास
By Admin | Updated: July 29, 2015 03:04 IST2015-07-29T03:04:11+5:302015-07-29T03:04:11+5:30
अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते.

२४८ प्रवाशांनी केला ‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास
दयानंद पाईकराव नागपूर
अचानक प्रवासाचा बेत रद्द झाला. वडिलांच्या ठिकाणी मुलाला, मुलीला किंवा मुलाच्या ठिकाणी वडिलांना जाण्याची वेळ आली की धावपळ होते. ऐनवेळी तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे प्रवास कसा करायचा असा प्रश्न निर्माण होते. परंतु रेल्वेतर्फे देण्यात येत असलेली ‘ब्लड रिलेशन’ची सुविधा वरदान ठरत आहे. १ एप्रिल ते २८ जुलै या कालावधीत २४८ प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेतल्याची नोंद आहे.
रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाचे तिकीट खरेदी केल्यानंतर अनेकदा अचानक प्रवास रद्द करण्याची पाळी येते. वडील प्रवास करीत असतील तर अनेकदा त्यांच्या ठिकाणी मुलाला जाण्याची पाळी येते. अशा परिस्थितीत रेल्वेतर्फे देण्यात येत असलेल्या ‘ब्लड रिलेशन’च्या सुविधेमुळे कुटुंबातील सदस्य प्रवास करू शकतात. त्यासाठी प्रवासाच्या २४ तास आधी रेल्वेच्या आरक्षण कार्यालयात जाऊन रीतसर अर्ज करावा लागतो. जी व्यक्ती प्रवास करणार होती तिचे ओळखपत्र, जी व्यक्ती ऐनवेळी प्रवास करणार आहे तिचे ओळखपत्र सादर करावे लागते. याशिवाय दोघांमधील नातेसंबंध दाखविणारा पुरावा सादर करावा लागतो. त्यानंतर संबंधित नातेवाईकास प्रवास करण्याची परवानगी मिळते. या सुविधेमुळे अनेक प्रवाशांना लाभ मिळत आहे. केवळ रक्ताच्या नातेवाईकांनाच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी जाणार असेल आणि ऐनवेळी त्याचा प्रवास रद्द करावयाचा असल्यास कार्यालयाच्या पत्रावर अर्ज केल्यास संबंधित अधिकाऱ्याच्या ठिकाणी दुसरा कर्मचारी जाऊ शकतो. परंतु कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला प्रवास करण्यासाठी प्रवासाच्या ४८ तास आधी अर्ज सादर करण्याचे बंधन आहे. १ एप्रिल ते २८ जुलै २०१५ या कालावधीत नागपूर विभागातून २४८ प्रवाशांनी ‘ब्लड रिलेशन’चे पुरावे जोडून प्रवास केल्याची नोंद आहे.
अशी आहे प्रक्रिया
‘ब्लड रिलेशन’मध्ये प्रवास करण्यासाठी आधी प्रवास करणारा आणि नंतर प्रवास करणारा प्रवासी या दोघांचेही ओळखपत्र द्यावे लागते. नातेवाईकांसाठी २४ तास आधी अर्ज सादर करावा लागतो. रक्ताचे नाते असल्याचा पुरावाही सादर करावा लागतो. यात रेशनकार्डवर सर्वच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्यामुळे हा पुरावा महत्त्वाचा ठरतो तर कार्यालयातील कर्मचाऱ्याला प्रवास करावयाचा असल्यास ४८ तास आधी कार्यालयाच्या पत्रावर अर्ज करावा लागतो.