२४१ हेक्टर वनजमीन आणि १०९ गावे होणार बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:02+5:302021-02-06T04:14:02+5:30
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : भाग ३ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील पहिल्या असलेल्या वैनगंगा-नळगंगा आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पासाठी १९,८१६ ...

२४१ हेक्टर वनजमीन आणि १०९ गावे होणार बाधित
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प : भाग ३
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील पहिल्या असलेल्या वैनगंगा-नळगंगा आंतरराज्यीय नदीजोड प्रकल्पासाठी १९,८१६ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे. या प्रकल्पात १०९ गावे बाधित होणार असून २६ गावे पूर्णत: तर ८३ गावे अंशत: बाधित होणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प हाती घेताना पूनर्वसनाचीही योजना आखावी लागणार आहे.
या प्रकल्पाच्या उभारणीतून ११ कोटी ३३ लाख नागरिकांना लाभ मिळणार असला तरी तीन हजार ७२५ कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार आहे. प्रकल्प आराखड्यानुसार १५ हजार ६४० व्यक्ती यामुळे विस्थापित होणार असून, त्यांच्या पूनर्वसनासाठी सरकारला नव्याने तरतूद करावी लागणार आहे.
या प्रकल्पासाठी बांधण्यात येणाऱ्या साठवणूक तलावांच्या उभारणी करताना गावांचा फटका बसणार आहे. अशा ३१ तलावांच्या उभारणीत १०९ गावे विस्थापित होणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील २३ गावे बाधति होणार असून, कुही तालुक्यातील १४, हिंगणातील ६, उमरेडमधील २० आणि नागपूर ग्रामीणमधील तीन गावांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात २५ गावे बाधित होणार असून, यात सेलू तालुक्यातील १०, आर्वीतील १४ आणि वर्धा ग्रामीणमधील एका गावाचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात २४ असून, धामणगाव तालुक्यातील दोन आणि नांदगाव खंंडेश्वरमधील २२ गावांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात ११ गावे असून, बार्शी-टाकळी तालुक्यातील ८ आणि अकोला ग्रामीणमधील तीन गावांचा समावेश आहे. यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात सहा गावे बाधित होणार असून, यात नेर व शेगाव या दोन तालुक्यांतील प्रत्येकी तीन गावांचा समावेश आहे.
...
तलावांच्या उभारणीत २४१ हेक्टर वनक्षेत्र जाणार
या प्रकल्पासाठी नव्यान बांधण्यात येणाऱ्या साठवणूक तलावांच्या खोदकाम आणि उभारणीमध्ये २४१ वनक्षेत्र जाणार आहे. प्रकल्प सहा जिल्ह्यांसाठी असता तरी नागपूर, वर्धा आणि अकोला या तीन जिल्ह्यांतील वनक्षेत्र तुटणार आहे. यात मकरधोकडा तलावाची क्षमता वाढविली जाणार असून, बोरखेडी-कलाल, लोअर काटेपूर्णा आणि येलवन येथे नव्याने तलाव खोदले जाणार आहेत. उमरेड (जि. नागपूर) येथील मकरधोकडा या जुन्या तलावाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी या भागातील १४१ हेक्टर जंगल तुटणार आहे. सेलू तालुक्यातील बोरखेडी कलाल (जि. वर्धा) येथे बांधण्यात येणाऱ्या तलावासाठी बोर अभयारण्याची ५० हेक्टर वनजमीन वापरावी लागणार आहे, तर बार्शी टाकळी (जि. अकोला) येथे नव्याने बांधल्या जाणाऱ्या लोअर काटेपूर्णा साठवणूक तलावासाठी दहा हेक्टर आणि येलवन साठवणूक तलावासाठी ४० हेक्टर वनजमीन कामी येणार आहे. या दोन्ही तलावांसाठी काटेपूर्णा अभयारण्याची जमीन प्रस्तावित आहे.
...
बाधित होणारी लोकसंख्या
प्रवर्ग कुटुंबव्यक्ती
अनु. जाती ६४२ २६९०
अनु. जमाती ४३७ १७८४
इमाव २६४६ ११,१६६
एकूण ३७२५ १५,६४०
...