२४ लाखाची धाडसी चोरी
By Admin | Updated: March 28, 2015 01:54 IST2015-03-28T01:54:41+5:302015-03-28T01:54:41+5:30
सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील छाप्रुनगर चौकातील एका मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी २३ लाखाचे मोबाईल

२४ लाखाची धाडसी चोरी
आरोपी सीसीटीव्हीत कैद : छाप्रुनगर चौकातील घटना
नागपूर : सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील छाप्रुनगर चौकातील एका मोबाईलच्या दुकानात चोरट्यांनी २३ लाखाचे मोबाईल व एक लाख रुपये रोख असा २४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असतानाही, घटनेच्या ४८ तासानंतरही पोलीस चोरट्यांचा सुगावा लावण्यास अपयशी ठरले आहेत. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
विक्रम चुग यांचे आॅरेंज सिटी मोबाईल कलेक्शन नावाने दुकान आहे. विक्रम बुधवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. गुरुवारच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजनुसार एक चोरटा आतमध्ये होता. तर दोघे दुकानाबाहेर लक्ष ठेवून होते. आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने दुकानातील इतर साहित्याची फेकफाक करून नामांकित कंपनीचे १४८ मोबाईल चोरून नेले. दुकानात शिरलेला चोरटा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतो आहे. चोरट्याने जास्तीत जास्त मोबाईल नेता यावे म्हणून दुकानातील इतर कुठल्याही साहित्याला हात लावला नाही. गुरुवारी नेहमीप्रमाणे विक्रम दुकानात आल्यावर त्यांना चोरट्यांचा उपद्रव लक्षात आला.
त्यांनी लकडगंज पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी गोळा केले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेतील आरोपी राज्याबाहेरील असल्याचा पोलिसांचा संशय आहे, त्यादृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांचे आवाहन
दुकानाच्या मालकाने चोरी गेलेल्या सर्व मोबाईलचे इएमआय नंबर पोलिसांना दिले आहे. जो कुणी चोरट्याकडून मोबाईल खरेदी करेल, इएमआय नंबरमुळे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहचू शकतात. कुणी स्वस्तात फोन विकत असेल तर त्यांच्याकडून फोन घेऊ नका. त्यांची माहिती पोलिसांना द्या, असे आवाहनही केले आहे.