इतवारी-छिंदवाडा दरम्यान धावणार २२ पॅसेंजर रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 12:04 IST2021-02-19T12:03:35+5:302021-02-19T12:04:10+5:30
Nagpur News इतवारी-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आता २२ फेब्रुवारीपासून या मार्गावर इतवारी-छिंदवाडा दरम्यान पॅसेंजर रेल्वेगाडी धावणार आहे.

इतवारी-छिंदवाडा दरम्यान धावणार २२ पॅसेंजर रेल्वेगाड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इतवारी-छिंदवाडा ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होऊन आता २२ फेब्रुवारीपासून या मार्गावर इतवारी-छिंदवाडा दरम्यान पॅसेंजर रेल्वेगाडी धावणार आहे. यामुळे नागपूर आणि छिंदवाडाच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वेगाडी क्रमांक ०८११९ इतवारी-छिंदवाडा पॅसेंजर रेल्वे इतवारीवरून सकाळी ७.४५ वाजता सुटून ११.४५ वाजता छिंदवाडाला पोहोचेल. ०८१२० छिंदवाडा-इतवारी पॅसेंजर गाडी छिंदवाडावरून दुपारी १२.४० वाजता सुटून सायंकाळी ५.३० वाजता इतवारीला पोहोचेल. इतवारी-छिंदवाडा दरम्यान पूर्वी नॅरोगेज गाड्या चालविण्यात येत होत्या. या मार्गावर ब्रॉडगेजचे काम २००८ मध्ये सुरू झाले. २०११ मध्ये हे काम पूर्ण होणार होते. परंतु त्यास बराच कालावधी लागला. मागील वर्षी सावनेर आणि भिमालगोंडी दरम्यान रेल्वे चालविण्यात आली. आता १३ वर्षांनंतर छिंदवाडा-इतवारी दरम्यान रेल्वेलाइनचे काम पूर्ण झाल्यामुळे २२ फेब्रुवारीपासून या मार्गावर पॅसेंजर गाड्या धावणार आहेत. यासोबतच ०८७४३ गोंदिया-इतवारी मेमु पॅसेंजर स्पेशल गाडी, ०८७४४ इतवारी-गोंदिया मेमु पॅसेंजर स्पेशल गाडी, ०८७४१ दुर्ग-गोंदिया मेमु पॅसेंजर स्पेशल गाडी आणि ०८७४२ गोंदिया-दुर्ग मेमु पॅसेंजर स्पेशल गाडी २२ फेब्रुवारीपासून धावणार आहे.
नागरिकांना दिलासा मिळणार
इतवारी-छिंदवाडा दरम्यान ब्रॉडगेज मार्गावर २२ फेब्रुवारीपासून पॅसेंजर रेल्वे चालविण्याच्या घोषणेमुळे नागपूर आणि छिंदवाडाच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी झेडआरयूसीसीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले. आता इतवारी रेल्वेस्थानकाचा टर्मिनलच्या रूपाने विकास करण्याची गरज आहे.
- डॉ. प्रवीण डबली, माजी झेडआरयूसीसी सदस्य, दपूम रेल्वे
...............