रेल्वेस्थानकावर २१ बेशिस्त प्रवाशांना पकडले
By Admin | Updated: April 24, 2015 02:14 IST2015-04-24T02:14:33+5:302015-04-24T02:14:33+5:30
प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे परिसरात प्रवेश करणे, महिला आणि अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणे गुन्हा असताना रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्या २१ प्रवाशांची धरपकड गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.

रेल्वेस्थानकावर २१ बेशिस्त प्रवाशांना पकडले
नागपूर : प्लॅटफार्म तिकीट न घेता रेल्वे परिसरात प्रवेश करणे, महिला आणि अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणे गुन्हा असताना रेल्वे नियमांचा भंग करणाऱ्या २१ प्रवाशांची धरपकड गुरुवारी रेल्वे सुरक्षा दलाने केली.
रेल्वे अॅक्ट १६२ नुसार महिलांसाठी राखीव असलेल्या कोचमधून महिला प्रवाशांनीच प्रवास करावा, असा नियम आहे. परंतु तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून महिलांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या १२ प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यशिवाय अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना पकडून त्यांच्याविरुद्ध रेल्वे अॅक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरात प्लॅटफार्म तिकीट खरेदी न करता प्रवेश करणाऱ्या पाच जणांना अटक करून त्यांच्या विरुद्ध रेल्वे अॅक्ट १४७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)