नोटाबंदीनंतर २१ हजार ‘वेटिंग’ रेल्वे तिकीट रद्द

By Admin | Updated: April 2, 2017 02:39 IST2017-04-02T02:39:50+5:302017-04-02T02:39:50+5:30

संपूर्ण देशात पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू झाल्यानंतर अचानक रेल्वे आरक्षणाच्या संख्येत वाढ झाली होती.

21 thousand 'waiting' train tickets canceled after cancellation | नोटाबंदीनंतर २१ हजार ‘वेटिंग’ रेल्वे तिकीट रद्द

नोटाबंदीनंतर २१ हजार ‘वेटिंग’ रेल्वे तिकीट रद्द

अडीच महिन्यांतील प्रतीक्षा यादीची संख्या : रेल्वेला परत करावे लागले सव्वादोन कोटी
नागपूर : संपूर्ण देशात पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू झाल्यानंतर अचानक रेल्वे आरक्षणाच्या संख्येत वाढ झाली होती. या कालावधीत प्रतीक्षा यादीतील तिकिटे काढण्यासाठी गर्दी उसळली होती. मात्र अडीच महिन्यांत हे ‘वेटिंग’ तिकीट रद्द करणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढीस लागले. नोटाबंदीनंतरच्या अडीच महिन्यांत २१ हजारांहून प्रतीक्षा यादीतील रेल्वे तिकीट रद्द करण्यात आले व मध्य रेल्वेने प्रवाशांना जवळपास सव्वादोन कोटी रुपये परत केले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मध्य रेल्वेकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत किती प्रवाशांनी रेल्वे तिकिटांचे आरक्षण केले, किती तिकीट रद्द झाले, नोटाबंदीच्या काळात किती रद्द तिकिटांचे पैसे परत करण्यात आले, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी १६ ते ३१ जानेवारी १७ या कालावधीत नागपूर विभागात ६८ लाख ६० हजार २५६ प्रवाशांचे तिकीट काढण्यात आले.
यापैकी १४ लाख ५७ हजार २२० प्रवाशांचे तिकीट रद्द झाले. रद्द झालेल्या तिकिटांची टक्केवारी ही २१.२४ टक्के इतकी आहे. नोटाबंदीनंतरच्या अडीच महिन्यांच्या काळात १६ लाख ५ हजार १० प्रवाशांचे तिकीट आरक्षित करण्यात आले.
याच कालावधीत ३ लाख ७६ हजार ७३४ प्रवाशांचा समावेश असलेली तिकिटे रद्द करण्यात आली. वर्षभरातील २३.४० टक्के तिकिटे या अडीच महिन्यांच्या काळात आरक्षित करण्यात आली. या कालावधीत रद्द तिकिटांचे २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७७१ रुपये परत करण्यात आले.(प्रतिनिधी)

तिकिटांपासून ४६८ कोटींचे उत्पन्न
१ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ या कालावधीत आरक्षित करण्यात आलेल्या तिकिटांपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला ४६८ कोटी ४९ लाख ६३ हजार ३६४ रुपयांचे उत्पन्न झाले तर रद्द केलेल्या तिकिटांपोटी मध्य रेल्वेने प्रवाशांना १०३ कोटी ३९ हजार ५३४ रुपये परत केले.

Web Title: 21 thousand 'waiting' train tickets canceled after cancellation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.