२०२० पर्यंत नागपूर ‘ग्लोबल’ होणारच
By Admin | Updated: November 23, 2015 02:30 IST2015-11-23T02:30:40+5:302015-11-23T02:30:40+5:30
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख बनविण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’सोबतच ‘ग्लोबल’ ....

२०२० पर्यंत नागपूर ‘ग्लोबल’ होणारच
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा विश्वास : ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ची सांगता
नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख बनविण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’सोबतच ‘ग्लोबल’ शहराकडे शहराची वाटचाल सुरू असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक नियोजन करायला हवे, असे मत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक व तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ची रविवारी सांगता झाली. यावेळी विविध देशांतील सदस्यांनी नागपूरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शहराच्या क्षमतेबाबत विश्वास व्यक्त केला.
‘नागपूर फर्स्ट’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल नागपूर समिट’ला शनिवारी आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टम्स येथे सुरुवात झाली होती. दोन दिवसांत विविध मुद्यांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आपली मते मांडली व नागपूरला मौलिक सल्ले दिले. युनायटेड किंगडम, कॅनडा, अमेरिका येथील तज्ज्ञांसह ब्रिटिश उपउच्चायुक्त कुमार अय्यर, स्विडनच्या मुंबई येथील महावाणिज्यदूत फ्रेडेरिका ओमब्राईंट, आॅस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत मार्क पिअर्स यांची उपस्थिती होती.
सांगता समारंभाच्या वेळी ‘नागपूर फर्स्ट’चे अध्यक्ष दिनेश जैन यांनी आपले मत मांडले. नागपूरला २०२० पर्यंत ‘ग्लोबल’ शहर करणे हे ‘नागपूर फर्स्ट’चे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या क्षमतांचे आम्ही पूर्ण प्रयत्न लावून ‘मार्केटिंग’ करू. शहराच्या काही कमकुवत आणि बलशाली बाजू आहेत. परंतु कमकुवत बाबी दूर सारुन बलस्थानांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असेदेखील ते म्हणाले.
वर्धा ‘आयटी पार्क’ची स्थापना करणाऱ्या झुबेर यांची प्रशंसा करत जैन म्हणाले की, नागपूरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उद्योग यावेत यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ सर्वांना जोडण्याचे प्रयत्न करत आहे. पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या वार्षिक ‘ग्लोबल नागपूर समिट’ची संकल्पना नागपूर व विदर्भातील विविध उद्योगांत होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर असेल, अशी घोषणा जैन यांनी यावेळी केली.
या दोन दिवसीय ‘ग्लोबल समिट’ला यशस्वी करण्यासाठी सहभागी असलेल्यांचे त्यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)