पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशासनाला स्वाधीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थायलंड येथील बौद्ध उपासक उपासकांकडून राज्य सरकारच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना यांच्या माध्यमातून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर प्रदान करण्यात आले आहेत. यातील ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर नागपूरलाही मिळाले असून, शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी ते विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले.
देशात कोरोनाची परिस्थिती पाहता भंते अजाहन जयासारो यांनी दानपारमिता अंतर्गत मदतीचे आवाहन केले होते. त्याला थायलंडच्या बौद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्यनिच कांबळे या थायलंड येथील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. त्यांच्या माध्यमातून देशभरात ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची मदत पोहोचविली जात आहे. रविवारी पाच लिटर क्षमतेचे ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर नागपूरसाठी मिळाले. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी डॉ. हर्षदीप कांबळे त्यांच्या पत्नी रोजाना कांबळे व थायलंडच्या बौद्ध उपासक व उपासिकांचे राज्य सरकारतर्फे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन कांबळे यांनी केले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, भंते विनय रक्खिता महाथेरो, भंते ज्ञानबोधी, प्रीतम बुलकुंडे, प्रफुल्ल भालेराव, रवी वेखंडे, धर्मेश फुसाटे नागेश बुरबुरे, धम्मपाल माटे, चंदू मडके प्रामुख्याने उपस्थित होते.
ॲम्बुलन्स-व्हेंटिलेटर्सचीही मदत
थायलंडतर्फे भारताला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरसोबतच ॲम्बुलन्स व व्हेंटिलेटर्सचीही मदत केली जात आहे. आतापर्यंत नागपूरसह, औरंगाबाद, राजगीर, नालंदा, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्थी येथील बुद्ध विहारे व रुग्णालयांनाही उपरोक्त वस्तू भेट देण्यात आल्या आहेत.