खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून बलात्कार करणाऱ्याला २० वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 20:19 IST2022-09-15T20:18:35+5:302022-09-15T20:19:13+5:30
Nagpur News विशेष सत्र न्यायालयाने कळमना येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली.

खेळण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीच्या डोळ्यावर पट्टी बांधून बलात्कार करणाऱ्याला २० वर्षांचा कारावास
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने कळमना येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावली, तसेच दंडाची निम्मी रक्कम पीडित मुलीला अदा करण्याचे सरकारला निर्देश दिले. न्या. आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला.
डोलचंद यादव चव्हाण (५४) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना ८ मे २०२१ रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. आरोपीने पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीला खेळण्याच्या बहाण्याने घरी नेले. त्यानंतर दोघींच्या डोळ्यांना पट्टी बांधली. त्यांचे हातही बांधले. दरम्यान, आरोपी हा पीडित मुलीवर बलात्कार करीत असताना एक व्यक्तिला मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे त्याने घराचे दार उघडून दोन्ही मुलींना आरोपीच्या ताब्यातून मुक्त केले. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अनिता खोब्रागडे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील आसावरी परसोडकर यांनी वैद्यकीय पुरावे, साक्षीदारांचे जबाब व महत्त्वाच्या इतर पुराव्यांच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध केला.