२० हजार नवीन सूचना
By Admin | Updated: November 11, 2015 02:24 IST2015-11-11T02:24:42+5:302015-11-11T02:24:42+5:30
उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला.

२० हजार नवीन सूचना
स्मार्ट सिटीचा दुसरा टप्पा : आता आॅनलाईन सूचना स्वीकारणार
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीसाठी निवड व्हावी यासाठी स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. शहराच्या विविध भागातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या स्मार्ट सूचनांचा स्वीकार करण्यात आला. तीन दिवसाात २० हजार नागरिकांनी सूचना केल्या आहेत. आता आॅनलाईन सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे.
एखादी समस्या असल्यास तिचा निपटारा करण्यासाठी नागरिकांनाच उपाययोजना सांगण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी अर्जाचा नमुना तयार करून त्यातील विविध प्रश्नावर नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावयाचे होते. यात नागरिकांचा अधिकाधिक सहभाग असावा यासाठी प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन रोड शो करण्यात आले. तसेच शहरातील २० ठिकाणी दर दोन तासांनी रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांनी अर्ज भरून सूचना केल्या. दुसऱ्या दिवशी ७ हजार तर तिसऱ्या दिवशी ३ हजार नागरिकांनी स्मार्ट सिटीसाठी सूचना केल्या आहे. तीन दिवसाच्या कालावधीत शहराच्या विविध भागात सकाळी ८ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले. पहिल्या टप्प्यात घरोघरी जाऊन लोकांच्या सूचना व कल्पना जाणून घेण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात प्रामुख्याने बाजार व वर्दळीच्या ठिकाणावर लक्ष केंद्रित करण्यात आले. मोहिमेला लोकांकडून प्रतिसाद मिळाला.
दुसऱ्या टप्प्यात पॅन सिटी इंटरव्हेन्शवर काम करण्यात आले. विश्लेषणात्मक सर्वेचे काम सुरू आहे. लवकरच स्मार्ट अॅप बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात ३० हजार लोकांच्या सूचना अपेक्षित होत्या. परंतु २० हजार लोकांच्या सूचना आल्या. आॅनलाईन सूचना स्वीकारल्या जात आहे. यात हा आकडा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख १६ हजार ८५० नागरिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले. यात सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता . (प्रतिनिधी)
१५ डिसेंबरपर्यंत अहवाल
स्मार्ट सिटीत नागपूर शहराचा समावेश व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू आहे. शहरातील नागरिकांकडून प्राप्त सूचनातून चांगल्या सूचनांचा स्वीकार केला जाणार आहे. याबाबतचा अहवाल १५ डिसेंबरपर्यंत सादर करावयाचा आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.