शेतकऱ्यांसाठी ९ राज्यात १९६ बेटर लाईफ फार्मिंग सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:00+5:302020-12-25T04:09:00+5:30
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायतराज आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ...

शेतकऱ्यांसाठी ९ राज्यात १९६ बेटर लाईफ फार्मिंग सेंटर
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास, पंचायतराज आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गुरुवारी ९ राज्यांत शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओ) च्या सहकार्याने चांगल्या कामकाजासाठी १९६ बेटर लाईफ फार्मिंग सेंटरचे उद्घाटन केले. एक लाख काेटींच्या कृषी पायाभूत सुविधा निधीमुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सुविधा पाेहचतील तसेच १० हजार एफपीओमुळे खेड्यांमध्ये नवीन राेजगार वाढण्यास चालना मिळेल, असा दावा कृषिमंत्र्यांनी यावेळी केला.
राज्यसभा खासदार पद्मश्री डाॅ. विकास महात्मे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. एक हजार प्रगतिशील शेतकरी व २०० एफपीओ सदस्य या कार्यक्रमात सहभागी हाेते. कृषिमंत्री ताेमर यांनी नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी लाभदायक असल्याचे सांगत याचे चांगले परिणाम देशाला दिसतील असा दावा केला. पंजाब वगळता सर्व राज्यातील शेतकऱ्यांचा या कायद्याला पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये बेटर लाईफ फार्मिंग सेंटर सुरू करण्यात आली आहेत. देशात ८६ टक्के लहान शेतकरी आहेत, ज्यांची स्वत:ची शेतीत गुंतवणुकीची क्षमता नाही आणि ते महागडी पिके घेण्याचा धोका घेऊ शकत नाहीत, पारंपरिक शेती करतात, ज्यामुळे त्यांना चांगल्या नफ्यापासून वंचित ठेवले जाते. तोमर म्हणाले, भारत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत वेगवान काम करीत आहे. खासगी गुंतवणूक होईस्तोवर कोणत्याही क्षेत्राची वाढ होत नाही. आतापर्यंत गावे, शेतकरी आणि ग्रामपंचायतींमध्ये पायाभूत सुविधांचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे खेडेगावात खासगी गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांच्या शेतात सुविधा पुरविणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.