तरुणाची १९ लाखांनी फसवणूक

By Admin | Updated: June 7, 2015 02:41 IST2015-06-07T02:41:20+5:302015-06-07T02:41:20+5:30

विदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची १९ लाखांनी फसवणूक केल्याची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

19 lakhs of youths cheated | तरुणाची १९ लाखांनी फसवणूक

तरुणाची १९ लाखांनी फसवणूक

नागपूर : विदेशात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची १९ लाखांनी फसवणूक केल्याची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. यासोबतच फसवणुकीच्या अन्य तीन घटना अजनी, तहसील आणि धंतोली ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
जय बजरंग सोसायटी सेमिनरी हिल येथील निवासी सारंग विलास भजनी (वय २८) हे नोकरीच्या शोधात होते. आॅनलाईन जॉब सर्च करताना त्यांचा डिसेंबर २०१३ मध्ये राहिदास (५०२,स्प्लेंडर अपार्टमेंट), गजुला रामाराम उषा मल्लुकुडी, हैदराबाद, अभिजित अल्डर, तानिया दास आणि त्यांच्या साथीदारांसोबत आॅनलाईन संपर्क आला. या टोळीने सारंग यांना विदेशात लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर सारंगसोबत आरोपींचा आॅनलाईन संपर्क वाढला. मेल, चॅटिंगवर प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून आरोपींनी गेल्या दीड वर्षात सारंगकडून १९ लाख २३ हजार ४५३ रुपये उकळले. याबदल्यात सारंगला बनावट नियुक्तीपत्रही देण्यात आले. सारंगने नियुक्तीसाठी संपर्क साधला तेव्हा त्यांना फसगत झाल्याचे लक्षात आले. त्यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक
मानेवाडा चौकातील रहिवासी दिलीप मनोहर सेनाड (वय ६६) यांची अनुज अग्रवाल, शेख, सोनिया कपूर, अतुल जैन, पूजा शर्मा, अतुल पांडे आणि आशुतोष राणा यांनी तीन लाखांनी फसवणूक केली. आरोपींनी सेनाड यांच्याशी संपर्क करून २६ डिसेंबर २०१४ ला रिलायन्स मॅक्स पॉलिसी काढली तर अल्पावधीत २ लाख १० हजार ७४० रुपयांच्या बदल्यात ११ लाख ९६ हजार ३९७ रुपये मिळतात, असे आमिष दाखवले. ही पॉलिसी काढावी म्हणून आरोपींनी सेनाड यांच्यामागे तगादाच लावला होता. त्यानंतर आरोपींनी सेनाड यांच्याकडुन वेगवेगळ्या खात्यात ३,०१,४५४ रुपये जमा करून घेतले. त्याबदल्यात सेनाड यांना आरोपींनी रिलायन्स व ईगॉन रेलीगेअर या नावाच्या दोन पॉलिसीच्या झेरॉक्स पाठवल्या. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे एप्रिल २०१५ मध्ये सेनाड यांनी आपल्या रकमेचा परतावा मागितला. मात्र, आरोपींनी असंबंध उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर सेनाड यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
आॅनलाईन चिटींग
हंसापुरीतील राम मंदिराजवळ राहाणाऱ्या योगेश प्रकाशराव वाकडे (वय ४१) यांच्या खात्यातून एका आरोपीने परस्पर ६० हजारांची आॅनलाईन खरेदी केली. शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ही आॅनलाईन चिटींग करण्यात आली.
दीपक मंडळ असे नाव सांगणाऱ्या आरोपीने ७५६२९०९८४२ क्रमांकाच्या मोबाईलवरून शुक्रवारी दुपारी ११.५६ वाजता वाकडेंना फोन केला. आपण आयसीआयसीआय बँक पुणे येथून बोलत असल्याची बतावणी करून त्याने वाकडेंच्या एटीएम तसेच बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. सायंकाळी ५ च्या सुमारास आरोपीने वाकडेंच्या खात्यातून स्वत:करिता ६० हजारांचे शॉपिंग केल्याचे उघड झाले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नोकराने केला विश्वासघात
बँकेत भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून ४५ हजार रुपये हडप करून एका नोकराने मालकाचा विश्वासघात केला. आनंद भर असे आरोपीचे नाव आहे. तो सहकारनगरातील शिवशक्ती लेआऊटमध्ये राहातो. गेल्या अनेक दिवसांपासून तो यशवंत स्टेडियममधील नांगिया सुझुकी आॅटोमोबाईल्समध्ये रोखपाल म्हणून काम करायचा. त्याच्यावर मालकाचा खूप विश्वास होता. त्यामुळे अनेकदा ते आनंदकडे बँकेत जमा करण्यासाठी मोठी रक्कम देत होते. १३ मे रोजी सकाळी अशाच प्रकारे नांगिया यांनी आनंदला ६५ हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी दिले. आनंदने त्यातील केवळ २० हजार रुपये बँकेत जमा केले. उर्वरित ४५ हजार रुपये स्वत: वापरले. ही बाब लक्षात आल्यानंतर नांगिया यांनी आनंदला पैसे परत करण्याची संधी दिली. मात्र, त्याने दगाबाजी केल्यामुळे अक्षित महेश नांगिया (वय २८, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, चितळे मार्ग, धंतोली) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. धंतोली पोलिसांनी आनंदविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: 19 lakhs of youths cheated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.