१८९ प्रवासी रात्रभर विमानातच

By Admin | Updated: April 19, 2016 06:22 IST2016-04-19T06:22:29+5:302016-04-19T06:22:29+5:30

मुंबई येथून कोलकाताकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी

189 passengers traveled all night in the plane | १८९ प्रवासी रात्रभर विमानातच

१८९ प्रवासी रात्रभर विमानातच

नागपूर : मुंबई येथून कोलकाताकडे जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानातील प्रवाशांना तांत्रिक कारणांमुळे संपूर्ण रात्र विमानात काढावी लागली. विमानातील एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे विमान नागपूर विमानतळावर रविवारी रात्री १०.३० वाजता आकस्मिक उतरवावे लागले होते. प्रवाशाला उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.
नियमानुसार विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर उड्डाण भरण्यासाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्यांकडून तांत्रिक तपासणी करून प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते. ही बाब देशांतर्गत व्यावसायिक सेवा देणाऱ्या कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. पण स्पाईसजेट कंपनीची विमान सेवा नागपुरात नसल्यामुळे कंपनीचे अभियंते नागपुरात उपलब्ध नव्हते. अभियंते दुसऱ्या विमानाने नागपुरात येईपर्यंत पहाट झाली. त्यांनी विमानाची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच सकाळी ५.३० च्या सुमारास विमानाने मुंबईकडे उड्डाण भरल्याची माहिती मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ संचालक अवधेश प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना दिली.
स्पाईसजेटच्या विमानात १८९ प्रवासी होते. रविवारी रात्री १०.३० ते सोमवार सकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्थात तब्बल ७ तास प्रवासी विमानात बसून होते. एअर इंडिया, इंडिगो, गो एअर आदी कंपन्यांची नागपूर विमानतळावर सेवा आहे.
या कंपन्यांचे अभियंते नागपुरात आहेत. पण त्या कंपन्यांच्या अभियंत्यांची सेवा न घेता स्पाईसजेटच्या अभियंत्यांसाठी रात्रभर थांबावे लागले. तांत्रिक कारणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)

Web Title: 189 passengers traveled all night in the plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.