१८६ संगणक ऑपरेटरवर बेरोजगारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:47+5:302020-12-27T04:06:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संकट काळात महापालिकेत मागील काही वर्षांपासून कार्यरत १८६ संगणक ऑपरेटरवर बेरोजगारीचे संकट आले ...

१८६ संगणक ऑपरेटरवर बेरोजगारीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड संकट काळात महापालिकेत मागील काही वर्षांपासून कार्यरत १८६ संगणक ऑपरेटरवर बेरोजगारीचे संकट आले आहे. सहा महिन्यासाठी कंत्राट पद्धतीने नवीन ऑपरेटरची भरती करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यांना वेतनाऐवजी मानधन देण्याची योजना आहे.
यामुळे संगणक ऑपरेटरचे दर महिन्याला ८ ते ९ हजारांचे नुकसान होणार आहे. हा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे. सध्या संगणक ऑपरेटरला दर महिन्याला १८४०० रुपये मिळतात. तर पीएफ व ईएसआयसी स्वरूपात ५००० ते ५२०० रुपये मिळतात. परंतु सध्या स्थायी समितीकडे जो प्रस्ताव येणार आहे त्यात संगणक ऑपरेटरला
१५५०० रुपये मिळणार आहे. त्यांना पीएफ व ईएसआयसीचा लाभ मिळणार नाही. कंत्राटदाराऐवजी मनपा स्वत: सहा महिन्यासाठी नियुक्ती करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामुळे संगणक ऑपरेटरवर अन्याय होणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार संगणक ऑपरेटरची भरती प्रक्रिया भाजप नगरसेवक व नेत्यांच्या निकटवर्तीयांना देण्याची तयारी सुरू आहे. ऑपरेटरच्या सहा महिन्यांच्या कामकाजानुसार पुढील सहा महिने कंत्राट वाढविला जाणार आहे. तसेच मनपा आयुक्तांना संगणक ऑपरेटरची नियुक्ती वा भरती करण्याचा अधिकार आहे.
.......
सांभाळतात विविध विभागांचे कामकाज
संगणक ऑपरेटर मनपाच्या विविध विभागात कार्यरत आहेत. ते आपल्या कामात तरबेज आहेत. काही विभागाचे कामकाज सांभाळत आहेत. त्यांना कमी केल्यास विभागाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.