४ वर्षात केली १८६ कोटीच्या कर्जाची परतफेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST2021-03-08T04:07:28+5:302021-03-08T04:07:28+5:30
नागपूर : बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्यांमुळे देश होरपळत आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार देशातील बँकांच्या बुडीत कर्जाची ...

४ वर्षात केली १८६ कोटीच्या कर्जाची परतफेड
नागपूर : बँकांना फसवून कष्टकऱ्यांचा पैसा लुटणाऱ्या कर्जबुडव्यांमुळे देश होरपळत आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार देशातील बँकांच्या बुडीत कर्जाची रक्कम ८ लाख कोटीपेक्षा अधिक आहे. कर्जबुडव्यांची यादी दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यातील अशिक्षित, गरीब, कष्टकरी महिलांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली आहे. गेल्या ४ वर्षांत नागपूर जिल्ह्यातील महिलांनी बँकांच्या १८६ कोटी रुपयांच्या कर्जाची एकही हप्ता न बुडविता परतफेड केली आहे.
नागपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान 'उमेद' हे महिलांसाठी काम करीत आहे. उमेद अभियानाचा मुख्य हेतू ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याचा आहे. ग्रामीण महिलांना स्वयंरोजगारक्षम करण्याच्या हेतूने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात ग्रामीण विकास यंत्रणा काम करते आहे. गावागावांत महिला बचत गट तयार करून, त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज पुरवठ्याची सोय आणि त्यांनी उत्पादित वस्तूंना प्रदर्शनांच्या माध्यमातून विक्रीची सोय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येते. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात १३,३३६ महिला बचत गट आहेत. यातील बहुतांश बचत गटांनी कर्ज घेऊन छोट्या मोठ्या व्यवसायाची उभारणी केली आहे. काही गटांच्या व्यवसायाची उलाढाल कोट्यवधीच्या घरात पोहोचली आहे. यंत्रणेच्या सहकार्यामुळे बचत गटांनी सॅनिटरी नॅपकीन, सेंद्रीय खतांची निर्मिती, ज्वेलरी, शर्ट, बॅग, मेणबत्ती, अगरबत्ती व छोटे मोठे गृह उद्योग लावले आहेत.
- महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ग्रामीण विकास यंत्रणेला लक्ष्य देण्यात येते. यात बचत गटांची निर्मिती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे, या माध्यमातून त्यांना आर्थिक स्थैर्य व स्वावलंबी बनविण्यात येते. या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक परिस्थिती काहीशी बदलेली आहे. त्यांच्यात एक उमेद जागृत झाली आहे. जी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारी आहे.
विवेक इलमे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा
- बचत गटांनी केलेली कर्जाची परतफेड
वर्ष बचतगट कर्जाची परतफेड
२०१७-१८ २७९६ ३०.४४ कोटी
२०१८-१९ ३२१६ ३८.७४ कोटी
२०१९-२० ४४५९ ६०.९२ कोटी
२०२०-२१ ४९३२ ५५.९५ कोटी