स्वप्ननिकेतनसाठी शनिवारी सोडत ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त
By गणेश हुड | Published: October 19, 2023 06:29 PM2023-10-19T18:29:30+5:302023-10-19T18:30:22+5:30
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्प उभारला जात आहे. येथील सदनिकांसाठी शनिवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे. ज्या नागरिकांनी विहित मुदतीत नोंदणी शुल्कासह अर्ज सादर केले आहेत, अत्यांनी संगणकीय सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील मौजा वांजरा येथे मनपाच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हा ४८० सदनिकांचे प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले वनबीएचके सदनिका आहेत. सदनिकेची एकूण बांधकामाची किंमत ११,५१,८४५ (अंदाजीत) एवढी असून प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य रु. ९,०१,८४५ रूपये आहे. या व्यतीरिक्त इलेक्ट्रीक मिटर, जीएसटी, रजीस्ट्री किंमत, स्टॅम्प डयुटी, सोसायटी डीपॉझीट, ॲग्रीमेंन्ट सेल डीड करीता अतिरिक्त शुल्क अदा करावे लागेल. सदनिका खरेदी करण्याकरिता ऑनलाईन माध्यमातून मनपाच्या पोर्टलवर अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला असून ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले आहेत.