१८ शाळा अनधिकृत
By Admin | Updated: July 4, 2015 03:08 IST2015-07-04T03:08:23+5:302015-07-04T03:08:23+5:30
शासनाची पूर्वपरवानगी न घेता शाळा सुरू करणे गुन्हा असताना नागपूर पंचायत समितींतर्गत १८ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे.

१८ शाळा अनधिकृत
शिक्षण विभाग : बंद करण्याचा आदेश, अन्यथा एक लाखांचा दंड
सुरेश फलके वाडी
शासनाची पूर्वपरवानगी न घेता शाळा सुरू करणे गुन्हा असताना नागपूर पंचायत समितींतर्गत १८ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे. या शाळा आठ दिवसांत बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. शाळा बंद न केल्यास एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
नागपूर पंचायत समिती अंतर्गत बाजारगाव केंद्रांतर्गत त्रिमूर्ती पब्लिक कॉन्व्हेंट, वसुंधरा कॉन्व्हेंट व इंग्रजी प्राथमिक शाळा, प्रियदर्शिनी कॉन्व्हेंट, बुटीबोरी केंंद्रांतर्गत गुरुकुल पब्लिक स्कूल, बोरखेडी (रेल्वे) केंद्रातील नालंदा नॉन रेसिडेंटल स्कूल, फेटरी केंद्रांतर्गत विंग्स कॉन्व्हेंट, मिलिनियम स्कूल, एस. एन. पब्लिक स्कूल, द बुद्धिस्ट स्कूल, हुडकेश्वर केंद्रांतर्गत ब्राईट स्टार कॉन्व्हेंट, खापरी केंद्रांतर्गत तथास्तु इंग्लिश प्राथमिक स्कूल, वाडी केंद्रांतर्गत न्यू स्टार पब्लिक स्कूल सोनबानगर, द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, शालोम विद्यामंदिर नवनीतनगर, बलसुम इंग्लिश स्कूल, डोंगरगाव केंद्रांतर्गत अल जामिया तसेच वेळाहरी केंद्रांतर्गत दिव्यज्योती कॉन्व्हेंट बेसा या शाळा अनधिकृत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
शासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे शाळा चालविणे हा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या शाळांना बंद करण्याबाबतचे पत्र शिक्षण विभागाने दिले आहे. आठ दिवसांत शाळा बंद न केल्यास कलम १८ (५) अन्वये एक लाखांपर्यंत दंड व त्यानंतरही शाळा सुरू ठेवल्यास प्रतिदिवस १० हजार रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.