५०० च्या १७ हजार बनावट नोटा आढळल्या
By Admin | Updated: April 19, 2017 02:41 IST2017-04-19T02:41:23+5:302017-04-19T02:41:23+5:30
नोटाबंदीदरम्यानच्या पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत ‘एसबीआय’च्या (स्टेट बँक आॅफ इंडिया) देशभरातील

५०० च्या १७ हजार बनावट नोटा आढळल्या
नोटाबंदीच्या काळातील ‘एसबीआय’मधील आकडेवारी : कर्मचाऱ्यांना मिळाला ४० कोटींचा भत्ता
नागपूर : नोटाबंदीदरम्यानच्या पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत ‘एसबीआय’च्या (स्टेट बँक आॅफ इंडिया) देशभरातील शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. यात बनावट नोटांचादेखील समावेश होता. या कालावधीत ५०० रुपयांच्या १७ हजार बनावट नोटा जमा करण्यात आल्या. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘एसबीआय’कडे विचारणा केली होती. ९ नोव्हेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत बँकेत किती ५०० व १००० रुपयांच्या रूपात रक्कम जमा झाली, यातील किती नोटा बनावट होत्या, अतिरिक्त कामासाठी कर्मचाऱ्यांना किती भत्ता देण्यात आला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. ‘एसबीआय’कडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, सुमारे पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत ‘एसबीआय’कडे ५०० व १००० रुपयांच्या स्वरूपात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ३ लाख २ हजार ५४७ कोटी रुपये जमा झाले. यातील ८५ लाखांच्या नोटा बनावट निघाल्या.
या कालावधीत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी जास्त वेळ थांबून काम केले होते. या अतिरिक्त कामासाठी ‘एसबीआय’तर्फे देशभरातील कर्मचाऱ्यांना ‘ओव्हरटाइम’ भत्ता म्हणून ४० कोटी ४३ लाख रुपये देण्यात आले. (प्रतिनिधी)