सात महिन्यात १७ गर्भवती एचआयव्हीबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:53+5:302020-12-02T04:11:53+5:30

- जागतिक एड्स दिन सुमेध वाघमारे नागपूर : सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे एचआयव्हीबाधित गर्भवतींची संख्या कमी होऊ लागली आहे. २०१६-१७ मध्ये ...

17 pregnant women infected with HIV in seven months | सात महिन्यात १७ गर्भवती एचआयव्हीबाधित

सात महिन्यात १७ गर्भवती एचआयव्हीबाधित

- जागतिक एड्स दिन

सुमेध वाघमारे

नागपूर : सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे एचआयव्हीबाधित गर्भवतींची संख्या कमी होऊ लागली आहे. २०१६-१७ मध्ये एचआयव्ही संसर्ग असलेल्या मातांची संख्या ७२ होती. २०१९-२० मध्ये ही संख्या कमी होऊन ३४ तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या सात महिन्यात १७ बाधितांची नोंद झाली. शिवाय, ‘पीपीटीसीटी’ या प्रतिबंध कार्यक्रमामुळे मागील वर्षीपर्यंत एचआयव्हीबाधित आईकडून जन्माला आलेल्या ३२१ अर्भकांना एचआयव्हीच्या संसर्गापासून मुक्त करणे शक्य झाले.

भारताच्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाला नवीन संसर्गाचा दर तब्बल ५७ टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. भारतात एचआयव्ही लागण झालेल्यांची संख्या २०१५ मध्ये सुमारे २.१ दशलक्ष इतकी होती. तर १५ वर्षांखालील मुलांची टक्केवारी एकूण एचआयव्हीबाधित लोकसंख्येच्या ६.५४ टक्के होती. यातील अनेकांना त्यांच्या पालकांकडून जन्माच्या वेळी हा आजार संक्रमित झाला होता. मुलांना एचआयव्ही होण्याचे मुख्य कारण म्हणजे एचआयव्हीबाधित आईकडून मुलांमध्ये झालेले संक्रमण. परंतु परिणामकारक औषधांच्या वापराने हे संक्रमण आता रोखणे शक्य झाले आहे. २००२ पासून सुरू झालेल्या ‘पालकांकडून अर्भकास होणाऱ्या एचआयव्ही संसर्ग प्रतिबंध कार्यक्रमा’चे (पीपीटीसीटी) चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत.

-१९१ एचआयव्हीबाधित गर्भवतींची नोंद

उपलब्ध माहितीनुसार, २०१६-१७ मध्ये ८४,०४२ गर्भवती महिलांची तपासणी केली असता ७२ (०.०९ टक्के) महिलांना एचआयव्ही संसर्ग असल्याचे समोर आले होते. २०१७-१८ मध्ये (एप्रिल ते मार्च) ८७,७६१ गर्भवती महिलांमधून ५८ (०.०७ टक्के ), २०१८-१९ मध्ये ९४,९६१ गर्भवती महिलांमधून ८३ (०.०४ टक्के ), २०१९ ते २० मध्ये ९०,१०३ गर्भवती महिलांमधून ३४ (०.०३ टक्के ) तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२० मध्ये ८२ हजार महिलांमधून १७ (०.०२ टक्के) महिला एचआयव्हीबाधित असल्याचे आढळून आले.

-एचआयव्ही मातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न

एड्ससंदर्भात सातत्याने प्रचार-प्रसार मोहीम सुरू आहे. औषधोपचार पद्धती, समुपदेशन आणि एचआयव्हीबाधितांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा फायदा होताना दिसून येत आहे. एचआयव्हीबाधित मातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

-डॉ. संजय जयस्वाल

उपसंचालक, आरोग्य सेवा मंडळ, नागपूर

Web Title: 17 pregnant women infected with HIV in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.