१७ घरफोडी करणारे आरोपी अटकेत

By Admin | Updated: June 18, 2016 02:33 IST2016-06-18T02:33:46+5:302016-06-18T02:33:46+5:30

हुडकेश्वर आणि अजनी परिसरात तब्बल १७ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

17 accused accused of burglary | १७ घरफोडी करणारे आरोपी अटकेत

१७ घरफोडी करणारे आरोपी अटकेत

हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी : २८ लाखांचा माल जप्त
नागपूर : हुडकेश्वर आणि अजनी परिसरात तब्बल १७ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरी केलेला २८ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
पवन सुभाष रेहमतकर (२१) रा. नरसाळा राधारमन कॉलनी, अंकुश विलासराव मुळे (२०) रा. मु.पो. घाटलाडकी ता. चांदूरबाजार जि. अमरावती ह.मु. नरसाळा, राधारमन कॉलनी, आणि स्वप्नील दत्तात्रय आजने (२०) रा. उल्हासनगर मानेवाडा रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी तब्बल १७ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यापैकी १६ घरफोडी ही हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत केली असून १ घरफोडी अजनी पोलीस ठाणे हद्दीत केली आहे. त्यांच्याजवळून अंदाजे किमत १३ लाख ८७ लाख ५०० रुपयाचे ५०२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४३० ग्रॅम (५७,२०० रुपये) चांदीचे दागिने, ३ दुचाकी वाहने (१ लाख ३० हजार रुपये), १ स्विफ्ट गाडी (४ लाख ५० हजार रुपये), १९ मोबाईल फोन व इतर सामान (४,६७,३१२ रुपये) आणि ३ लाख ७० हजार रुपये रोख असे एकूण २८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.के. झावरे यांनी सांगितले की, पवन हा या टोळाचा मुख्य सूत्रधार आहे. या तिघांनीही शिक्षण सोडले आहे. अंकुश हा अमरावतीवरून शिक्षणासाठी नागपुरात आला होता. तो पवनच्या घरासमोरच भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथेच दोघांची ओळख झाली. यातून दोघांनी चोरीची योजना आखली. सुरुवातीला दोघेही बाईकने फिरून घरफोडी करायचे. परंतु सापडले जाण्याची भीती लक्षात घेऊन ते आॅटोने फिरू लागले. दोघेही कॉलेज बॅग घेऊन आॅटोने फिरायचे. कुलूप लागलेल्या घरांवर पाळत ठेवायचे. रात्री १२ पर्यंत ज्या घरी कुलप लागलेले असायचे, त्या घराचे कुलूप तोडून चोरी करायचे. घरफोडी करण्याचे साहित्य त्यांच्या बॅगेतच राहत असे. तसेच चोरीचे साहित्य ते बॅगेत टाकून न्यायचे. त्यामुळे त्यांच्यावर कुणाला शंका येत नव्हती. तसेच या आरोपींचे कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्डसुद्धा नव्हते. नवीन आरोपी असल्याने त्यांचा शोध घेणे एक आव्हान होते. परंतु हे आव्हान हुडकेश्वर पोलिसांनी स्वीकारले. (प्रतिनिधी)

असे सापडले आरोपी
चार महिन्यांपासून या आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींनी अनेक ठिकाणांहून मोबाईल व एटीएम कार्ड चोरले होते. यापैकी काही कार्डवर एटीएमचा कोडनंबरही लिहून असल्याने त्यांना पैसे काढण्यास सोपे गेले. पोलीस ज्या ठिकाणी चोऱ्या झाल्या तेथील प्रत्येक ठिकाणांवर पाळत ठेवून होते. हनुमाननगर येथील एका एटीएममधून एक मुलगा सातत्याने पैसे काढत असल्याचे दिसून आले. तो पवन होता. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याच्या मोबाईल सर्व्हिलन्सची तपासणी केली असता त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेतले तेव्हा घरफोडी करणारी ही टोळी उघडकीस आली.

चोरीच्या पैशातून महाराष्ट्र दर्शन
पवन आणि अंकुश हे चोरी करायचे तर स्वप्नील हा चोरलेले दागिने विकायचा. चोरलेल्या सोन्याच्या दागिन्याच्या मोबदल्यात त्यांनी एक स्विफ्ट गाडी घेतली होती. या गाडीने ते गोवा, शेगाव, गणपतीपुळे आदीसह महाराष्ट्र दर्शन करून आले. अटक होण्याच्या एक दिवसापूर्वीच ते फिरून आले होते.
ओएलएक्सवर विकले चोरीचे मोबाईल
आरोपींनी अनेक ठिकाणांवरून मोबाईल, कॅमेरे आदीसह अनेक वस्तू चोरल्या. या वस्तू त्यांनी ओएलएक्सवर आॅनलाईन विकल्याची बाबही उघडकीस आली.
पोलीस आयुक्त करणार सत्कार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.के. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के.व्ही. चौगले, पोलीस हवालदार संदीप गुंडलवार, गुरुदेव कुंभलकर, पोलीस शिपाई नितीन आकोते, सूरज भोंगाडे, पंकज तांबडे, विलास चिंचुलकर, सचिन तुमसरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. शनिवारी होणाऱ्या क्राईम मिटिंगमध्ये पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त इशू सिंधू यांनी सांगितले.

Web Title: 17 accused accused of burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.