१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त
By Admin | Updated: October 16, 2015 03:18 IST2015-10-16T03:18:51+5:302015-10-16T03:18:51+5:30
नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील ...

१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त
२ कोटी ७७ लाख रुपयांचे सावकारी कर्ज माफ
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले ५२९ शेतकऱ्यांचे ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये इतके कर्ज गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत माफ करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकूण १६७५ शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्तता मिळाली आहे. आतापर्यंत एकूण १७५ सावकारांकडून घेतलेले २ कोटी ७७ लाख २५ हजार ५९२ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी रतनसिंह यादव, उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी डी एस. पारसे, सहायक निबंधक टी.एन. चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे उपस्थित होते.
गुरुवारच्या बैठकीत उमरेड तालुक्यातील २६७ शेतकऱ्यांचे ४५ लाख ३४ हजार ७९७ रुपये, काटोल येथील २१४ शेतकऱ्यांचे २३ लाख २४ हजार ८८३ रुपये, रामटेक येथील २३ शेतकऱ्यांचे ४ लाख १९ हजार ९०७ रुपये, हिंगणा येथील ४ शेतकऱ्यांचे २९,५३२ रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचे २ लाख ६९ हजार ३५५ रुपये असे एकूण ५२९ शेतकऱ्यांनी घेतलेले ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये कर्ज माफ करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांची प्रकरणे तालुकास्तरीय समितीने अद्यापपर्यंत निकाली काढली नाहीत. ती प्रकरणे येत्या २८ आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीत केली. परवानाधारक सावकारांनी त्यांच्या स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्याचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)