१६ स्टार बस जप्त
By Admin | Updated: August 11, 2015 04:02 IST2015-08-11T04:02:52+5:302015-08-11T04:02:52+5:30
वंश निमयकडे प्रवासी व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकलेले असताना व मुदत देऊनही कर भरत

१६ स्टार बस जप्त
नागपूर : वंश निमयकडे प्रवासी व वाहन कर असे मिळून ८ कोटी ३३ लाख रुपये थकलेले असताना व मुदत देऊनही कर भरत नसल्याने अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरला सोमवारी १६ धावत्या स्टार बसेसवर कारवाई करावी लागली. ही कारवाई वाडी व हिंगणा मार्गावरील बसेसवर झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. या कारवाईने महानगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली. कारवाई थांबविण्यासाठी महापौरांनी आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती आहे.
मुंबई मोटार वाहन कर कायदा १९६९नुसार प्रवासी कर हा प्रति तिकिटावर साडेसतरा टक्के लावला जातो. २००७ पासून वंश निमयने या कराचा एकही रुपया भरलेला नाही. यामुळे प्रवासी कर ८ कोटी २० लाखांवर गेला आहे. याशिवाय मोटार वाहन कर कायदा १९५८ नुसार ७१ रुपये प्रति सीट, प्रति वर्षानुसार असलेला वाहन कर हा २०१३ पासून भरलेला नाही. हा कर १३ लाखांवर गेला आहे. एकूण वंश निमयला प्रवासी कर व वाहन कर मिळून असे ८ कोटी ३३ लाख रुपये भरायचे आहे. या संदर्भात आरटीओने ९ जुलै रोजी महापालिकेला नोटीस बजावून थकीत रक्कम जमा करण्याची सूचना केली होती.
महापालिकेने वंश निमयला या संदर्भात नोटीस बजावली. थकीत रक्कम भरण्याचे निर्देश दिले. परंतु वंश निमयने महापालिकेकडेच रक्कम थकीत असल्याचा दावा केला होता. दरम्यानच्या काळात मनपा आयुक्तांच्या अधिकारात ही बाब नसतानाही त्यांनी आरटीओकडे पैसे भरण्यासाठी वेळ मागितला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने ४ आॅगस्टच्या अंकात सामान्यांना मुदत न देणारे आरटीओ कार्यालय स्टार बसवर कारवाई करण्यास कचुराई का दाखवित आहे, असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची व परिवहन आयुक्तांच्या निर्देशाची दखल घेत गुरुवारीच आरटीओने स्टारबसवर कारवाई करण्याची रूपरेषा ठरविली.
हिंगणा-वाडी प्रवाशांची धावाधाव
४हिंगणा व वाडी मार्गावर दिवसभरात स्टारबसमधून सुमारे १० हजारावर प्रवासी ये-जा करतात. सोमवारी सकाळपासून आरटीओ, शहर कार्यालयाने कारवाई करीत एक-एक बसेसवर कारवाई सुरू केली. यामुळे प्रवाशांना बसथांब्यावर तासन्तास उभे राहावे लागले. सायंकाळी ५ वाजतानंतर तर या दोन्ही मार्गावरील बससेवाच ठप्प पडली. परिणामी, या दोन्ही मार्गावरील बसथांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती. बस नसल्याने प्रवाशांना आॅटोरिक्षा व अवैध प्रवासी वाहनातून वाहतूक करावी लागली.