१६ कोटींचे गारमेंट क्लस्टर!
By Admin | Updated: June 2, 2015 02:05 IST2015-06-02T02:05:26+5:302015-06-02T02:05:26+5:30
केंद्र सरकारच्या योजनेनुसार नागपुरात गारमेंट क्लस्टरची (समूह) स्थापना झाली असून त्या माध्यमातून हजारोंना रोजगार

१६ कोटींचे गारमेंट क्लस्टर!
मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर
केंद्र सरकारच्या योजनेनुसार नागपुरात गारमेंट क्लस्टरची (समूह) स्थापना झाली असून त्या माध्यमातून हजारोंना रोजगार मिळाला आहे. पहिल्याच वर्षी उपयोगकर्त्यांकडून शुल्क स्वरूपात जवळपास ७० लाख रुपये मिळाले आहे. अद्ययावत मशिनरी आणि आधुनिक सुविधांमुळे नागपुरात गारमेंट उत्पादन उद्योगाची भरभराट होत आहे.
गारमेंट उत्पादक एकाच छताखाली
१६ कोटी रुपयांचे गारमेंट क्लस्टर आहे. उत्तर नागपुरात उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रामागे एक एकर जागेत ‘आॅरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूर’ या नावाने क्लस्टरची स्थापना पाच वर्षांपूर्वी झाली. जिल्ह्यात जवळपास ५०० कोटी रुपयांची उलाढाल, पण विखुरलेल्या गारमेंट उत्पादकांना एकाच छताखाली आणून त्यांना अत्याधुनिक मशीनद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रशिक्षण देण्याचा क्लस्टरचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशात हे क्लस्टर यशस्वी ठरले आहे.
क्लस्टरचे तीन विभागात कार्य
एकूण १६ कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या क्लस्टरमध्ये ४२ जणांचे ३ कोटींचे समभाग तर केंद्र सरकारचा १३ कोटींचा वाटा आहे. केंद्र सरकार मशीन खरेदीसाठी पैसा दिला आहे, तर जागा आणि इमारतीचे बांधकाम कंपनीने केले आहे. या क्लस्टरमध्ये एम्ब्रायडरी, वॉशिंग व फिनिशिंग आणि स्टिचिंग हे तीन विभाग आहेत. प्रत्येक विभागात गारमेंट उत्पादकांचे काम होणार असून त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. एम्ब्रायडरी विभागात सात कोटी रुपयांची मशीन बसविली असून वर्षापूर्वी कामही सुरू झाले आहे. शिवाय वॉशिग व फिनिशिंग विभागात १.२५ कोटीं रुपयांची मशीन आली आहे. उभारणीचे काम सुरू आहे. याशिवाय पाच कोटी रुपयांची हायटेक स्टिचिंग मशीन (सिलाई) लवकरच येणार असल्याची माहिती आॅरेंज सिटी गारमेंट क्लस्टर, नागपूरचे संचालक विपुल पंचमतिया यांनी लोकमतशी बोलताना दिली.
केंद्र सरकारची योजना
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अशोक धर्माधिकारी यांनी सांगितले की, या क्लस्टरमुळे गारमेंट उद्योगाच्या विकासाला चालना मिळाली असून अनेकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, शिवाय छोटे गारमेंट उत्पादक एकाच छताखाली आले आहेत. हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने चालावा, याकरिता ‘गारमेंट क्लस्टर’ (समूह) स्थापनेला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. नवीन व विकसित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी छोटे उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे ते अत्याधुनिक मशीनचा उपयोग करू शकत नाही. शिवाय कपडे तयार करण्यासाठी लागणारी वेगळी यंत्रणाही त्यांच्याकडे नाही. गारमेंट उद्योगाच्या उभारणीसाठी नवे तंत्रज्ञान आणि मशीनरीची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी गारमेंट क्लस्टर उभारण्यात आले आहे. एखादा उद्योजक अत्याधुनिक मशीन घेण्यास इच्छुक असेल तर तेथील कामगारांना या क्लस्टरमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे प्रत्येक उद्योगाला कुशल कामगार मिळेल, तसेच त्या उद्योगाची भरभराट होईल, असे धर्माधिकारी म्हणाले.
कॅज्युअल शर्टचे उत्पादन शक्य
वॉशिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने कॅज्युअल शर्टचे उत्पादन नागपुरात होत नाही. पण या क्लस्टरमध्ये हायटेक आणि फिनिशिंग मशीन उपलब्ध असल्यामुळे कॅज्युअल शर्टची निर्मिती आता नागपुरात करणे शक्य आहे. यामुळे गारमेंट व्यवसायात निश्चितच वाढ होणार आहे.
पहिल्याच वर्षी ७० लाखांचे उत्पन्न
गारमेंट क्लस्टरमधील एम्ब्रॉयडरी विभागाला जून २०१४ ते मार्च २०१५ या काळात बाहेरील गारमेंट उत्पादकांकडून कामाच्या मोबदल्यात ६० ते ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचा उपयोग कामगारांचे वेतन, वीज बिल आणि इतर कामांसाठी झाला आहे. पुढे तिन्ही विभागात विविध मशीनवर काम सुरू झाल्यास दरवर्षी दोन कोटींपेक्षा जास्त शुल्क गोळा होईल, शिवाय या क्षेत्रात गारमेंट उद्योगांची भरभराट होणार आहे.