महाराजबागेतील रस्ता रुंदीकरणासाठी १५९ झाडांची कत्तल होणार!
By Admin | Updated: July 17, 2015 03:27 IST2015-07-17T03:27:29+5:302015-07-17T03:27:29+5:30
सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल हॉस्पिटल ते महाराजबागमार्गे मातृसेवा संघापर्यंत ४०० मीटर लांबीचा

महाराजबागेतील रस्ता रुंदीकरणासाठी १५९ झाडांची कत्तल होणार!
नागपूर : सीताबर्डी येथील म्यूर मेमोरियल हॉस्पिटल ते महाराजबागमार्गे मातृसेवा संघापर्यंत ४०० मीटर लांबीचा एक अॅप्रोच मार्ग तयार केला जात आहे. त्यानुसार भगिनी मंडळापर्यंत या मार्गाची रुंदी सुमारे १२ मीटर राहणार असल्याची माहिती आहे. परंतु डीपी प्लॅननुसार तयार करण्यात येणाऱ्या या मार्गातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्र व महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा भिंतीशेजारच्या सुमारे १५९ झाडांची कत्तल केली जाणार आहे. यासाठी महाराजबागेतील मोगली गार्डनपर्यंत सिमेंट पोल गाडून मार्किंग करण्यात आली आहे. शिवाय रस्त्याच्या मध्ये येणाऱ्या झाडांना नंबर दिले जात असून, त्यांना लवकरच तोडण्याची तयारी केली जात आहे. यासंबंधी महाराजबाग व्यवस्थापनाकडे कोणतीही माहिती नाही. परंतु मनपाच्या उद्यान विभागाचे उपअभियंता सुधीर माटे यांच्या मते, या झाडांच्या कटाईसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)