गर्भपातासाठी पाच वर्षांत १५०० कुमारी मातांची नोंदणी
By Admin | Updated: May 26, 2017 02:42 IST2017-05-26T02:42:43+5:302017-05-26T02:42:43+5:30
उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे १५०० कुमारी मातांची नोंदणी झाली.

गर्भपातासाठी पाच वर्षांत १५०० कुमारी मातांची नोंदणी
मनपाच्या ‘एमटीपी’ केंद्रातील आकडेवारी : सहा मातांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या ‘एमटीपी’ केंद्रात (मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नंसी) गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे १५०० कुमारी मातांची नोंदणी झाली. तर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील नोंदींनुसार यापैकी सहा कुमारी मातांचा मृत्यू झाला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी कुमारी मातांसंदर्भात मनपाकडे विचारणा केली होती. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत कुमारी मातांची झालेली नोंदणी, यादरम्यान झालेले मृत्यू, मनपाच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे इत्यादींबाबत त्यांनी प्रश्न विचारले होते. ५ डिसेंबर २०१३ पासून ‘एमटीपी’ केंद्रांची नोंदणी नागपूर महानगरपालिकेकडून केली जाते. माहितीच्या अधिकाराबाबत नागपूर महानगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीमध्ये गर्भपातासाठी १,५०१ कुमारी मातांनी नोंदणी केली. सर्वात जास्त ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ या कालावधीत झाली. या कालावधीदरम्यान सहा कुमारी मातांचा मृत्यू झाला. यातील एक कुमारी माता अल्पवयीन होती. या कालावधीत ३० ‘एमटीपी’ केंद्रांची नोंदणी झाली.