नागपुरात अवतरले १५० गांधीजी; देशातील पहिला उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 15:57 IST2019-10-02T15:56:45+5:302019-10-02T15:57:33+5:30
महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला.

नागपुरात अवतरले १५० गांधीजी; देशातील पहिला उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: महात्मा गांधीजींच्या वेशातल्या तब्बल १५० विद्यार्थिनी आणि कस्तुरबा गांधी यांच्या पेहरावातल्या १३ विद्यार्थिनींनी बुधवारी नागपुरात स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास साकारला.
शहरातील भिडे कन्या शाळा व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. अभिवादन यात्रा असे नाव असलेल्या या उपक्रमात शाळेतील तब्बल १५० विद्यार्थिनींना गांधीजींच्या वेशात सादर करण्यात आले होते तर १३ जणींना कस्तुरबांचा वेश दिला होता. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम असावा अशी चर्चा यावेळी होती.
या अभिवादन रॅलीला जिल्हा परिषदेचे कार्याधिकारी संजय यादव यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. ही रॅली व्हरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ््यापाशी पोहचली. तेथे गांधीजींची तीन भजने म्हणण्यात आली. हे घडत असताना एरव्ही गर्दीने ओसंडून वाहणारा हा चौकही काही काळ स्तब्ध होऊन पाहत होता.
या रॅलीदरम्यान प्लास्टिकमुक्तीवरील पथनाट्य, गांधीजी की जीवनगाथा, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सूतकताई आदी पथनाट्येही व प्रसंग सादर करण्यात आली.
दमक्षेचे सहसंचालक मोहन पारखी, शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे, शिक्षणाधिकारी डॉ. एस.एन. पटवे, भिडे एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बाबा नंदनपवार, सचिव विवेक सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.