१५ दिवसांत बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 19:51 IST2017-12-15T19:43:48+5:302017-12-15T19:51:55+5:30
राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली.

१५ दिवसांत बोंडअळीग्रस्त पिकांचे पंचनामे होतील
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात कापूस पिकाखाली ४१ लाख हेक्टरचे क्षेत्र असून विदर्भात अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यासंदर्भात पिकांचे पंचनामे सुरू झाले असून १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भातील मुद्दा अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, धनंजय मुंडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला.
बोंडअळीचे संकट हे मानवनिर्मित आहे.शेतकऱ्यांचे यंदा यामुळे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून त्यांना एकरी २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच अर्ज करताना बियाण्यांच्या पाकिटावरील ‘रॅपर’देखील सादर करण्याची अट रद्द करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याला उत्तर देताना खोत यांनी आतापर्यंत शासनाकडे पाच लाख तक्रार अर्ज आले असल्याचे स्पष्ट केले. अर्ज दाखल करताना ‘रॅपर’ सादर करणे अनिवार्य राहणार नाही. केवळ बियाणे खरेदीची पावती जोडली तरी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. ‘नॉन बी.टी.’ तपासणीसाठी ९९६ नमुने काढण्यात आले. त्यापैकी १५१ नमुने अप्रमाणित आढळून आले. ११० प्रकरणांमध्ये कोर्ट केसेस दाखल करण्यात आल्या असून इतर प्रकरणांतदेखील असेच पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कुठलीही कंपनी असो, गुन्हे दाखल होतील
अप्रमाणित नमुने आढळणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कंपनी कितीही मोठी असली तरी तिच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी खोत यांनी सभागृहाला सांगितले. शिवाय दोषयुक्त बियाण्यांना विक्रीअगोदर प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.