१४ अवैध प्रवासी वाहने जप्त
By Admin | Updated: June 27, 2014 00:40 IST2014-06-27T00:40:39+5:302014-06-27T00:40:39+5:30
शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली १४ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक तर दोन जीप आहेत. कधी नव्हे ते या अचानक झालेल्या कारवाईने

१४ अवैध प्रवासी वाहने जप्त
आरटीओची कारवाई : अनेक वाहनधारक भूमिगत
नागपूर : शहरात अवैध प्रवासी घेऊन धावत असलेली १४ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने जप्त केली. यात १२ टाटा मॅजिक तर दोन जीप आहेत. कधी नव्हे ते या अचानक झालेल्या कारवाईने अवैध प्रवासी वाहनधारकांचे धाबे दणाणले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कारवाईच्या भीतीने अनेक अवैध वाहनधारक भूमिगत झाले आहेत.
‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘मृत्यूचा महामार्ग कामठी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तामुळे खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेऊन आरटीओ शहर कार्यालयाने ही कारवाई केली.
नागपूर- कामठी रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत आहे. मागील १४ महिन्यात ५७ अपघात झाले आहेत. यात ५१ जण जखमी तर तब्बल २१ जणांना प्राणाला मुकावे लागले. असे असतानाही या मार्गावर पोलिसांसमक्ष मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अॅपे, सहासीटर अशा साधारण ३०० वाहनांतून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे. सहा सिट्सची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने वर्दळ करतात. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांसमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कामठी रोडवर धावत असलेल्या शंभर ‘मॅजिक’ या दरमहा सात हजार रुपये तर सहासीटर दरमहा तीन हजार रुपये हप्ता देत असल्याची धक्कादायक माहिती यांच्यातीलच एका चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. त्याने सांगितले, गोलू नावाचा एक गुंड सात हजाराचा हप्ता जमा करतो. हा हप्ता एका आमदारासोबतच इंदोरा, मीठानिम दर्गा आणि गिट्टीखदान वाहतूक पोलीस विभागाला जातो. तर सहासीटरकडून कमरुबाबा नावाचा गुंड हप्ता गोळा करतो. गांधीबाग व इंदोरा वाहतूक पोलीस विभाग मिळून हा हप्ता दिला जातो, अशीही माहिती त्याने दिली.
हे सविस्तर वृत्त प्रकाशित होताच वाहतूक पोलीस यंत्रणेने सक्रिय होणे आवश्यक होते, परंतु आरटीओ शहर कार्यालयाने याची दखल घेतली. (प्रतिनिधी)