अजनी रेल्वे पुलाचा १३८ कोटीचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 14, 2015 03:16 IST2015-12-14T03:16:44+5:302015-12-14T03:16:44+5:30
अजनी रेल्वे पुलाच्या ठिकाणी जुन्या पुलाऐवजी दोन पदरी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेने रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे.

अजनी रेल्वे पुलाचा १३८ कोटीचा प्रस्ताव
महापालिकेकडून तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती : मुख्यमंत्र्यांची माहिती
नागपूर: अजनी रेल्वे पुलाच्या ठिकाणी जुन्या पुलाऐवजी दोन पदरी नवीन पूल बांधण्याबाबत महापालिकेने रेल्वे विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. यासाठी महापालिकेने तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती केली असून या पुलाचा १३८ कोटीचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी लेखी प्रश्नाच्या उत्तरात विधानपरिषदेत दिली. नागपूर शहरातील लोखंडी पूल व अजनी पूल या ब्रिटिशकालीन पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे असले तरी रेल्वे विभागाकडून केलेल्या तपासणी अहवालात हे पूल सुस्थितीत असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांनी कळविले आहे.
लोखंडी पुलाचे बांधकाम १९२१ साली तर अजनी रेल्वे पुलाचे बांधकाम १९२७ साली करण्यात आले आहे. या दोन्ही पुलाला पर्यायी व्यवस्था महापािलकेकडून करण्यात येत आहे. लोखंडी पुलापासून १५० मीटर अंतरावर आंनद टॉकीजजवळ चारपदरी भुयारी रेल्वे पुलाचे काम करण्यात आले आहे. या पुलाखालून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे लोखंडी पुलाखालून होणारी वाहतूक कमी झाल्याची माहिती फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली.
सदस्य अनिल सोले, नागो गाणार व नितीश भांगडिया आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.(प्रतिनिधी)