१.३१ लाख शौचालये बांधणार
By Admin | Updated: February 4, 2015 00:56 IST2015-02-04T00:56:50+5:302015-02-04T00:56:50+5:30
ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.

१.३१ लाख शौचालये बांधणार
निर्मल ग्राम अभियान : ग्रामपंचायतीवर जबाबदारी
नागपूर : ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे ,यासाठी निर्मल ग्राम अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून दिली जाणार आहेत.
केंद्र सरकारने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेनुसार नागपूर जिल्ह्यात १,३१००० हजार कुटुंबांकडे शौचालय नाही. निर्मल भारत अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरजू व गरीब कुटुंबांना शौचालय बांधकामासाठी अनुदान दिले जाते. मागील दोन-तीन वर्षात १३००० शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. मनरेगातर्फेही शौचालय बांधकाम योजना राबविण्यात आली. परंतु अनुदान कमी होते व ते टप्प्याटप्प्याने मिळत होते. त्यामुळे या योजनेला लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी यातून मार्ग काढला आहे. शौचालय बांधकामाची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शौचालय नसलेल्या कुटुंबांची यादी तयार करून ती आॅनलाईन करण्यात आली आहे. शौचालय नसलेल्यांची यादी व ग्राम पंचायतीचा ठराव जि.प.कडे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या वा गाव सोडून गेलेल्या लोकांमुळे शौचालय नसलेल्या कुटुंबांची संंख्या दरवर्षी बदलते. त्यामुळे जिल्ह्यात फेरसर्वे केला जाणार आहे. प्राप्त प्रस्तावानुसार ग्राम पंचायतींना शौचालयासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. शौचालयासाठी आता १२००० चे अनुदान दिले जाते. तसेच इंदिरा आवास लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात १६००० शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट आहे. मार्चपर्यंत ते पूर्ण होईल. २०१५-१६ या वर्षात ३१००० शौचालयांचे उद्दिष्ट आहे. २०१९ पर्यत जिल्ह्यातील सर्व कुटुंबांकडे शौचालय असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
गडकरींच्या निर्णयामुळे गती मिळाली
कें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शौचालय बांधकामासाठी प्रत्येकी १२००० हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यामुळे योजनेला गती मिळाली आहे. ग्रामपंचायतीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने २०१९ सालापर्यत जिल्ह्यातील १,३१००० कुटुंबांना शौचालये बांधून देण्याची ग्वाही शिवाजी जोंधळे यांनी दिली.
पंचायत विभागाचे सहकार्य
योजना प्रभावीपणे राबविली जावी यासाठी जि.प.च्या पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायतींना सूचना देण्यात आली आहे. यासाठी विभाग सहकार्य करीत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव भांडारकर यांनी दिली.