वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचे १३ टक्के कर्मचारी आहेत 'वजनदार'
By सुमेध वाघमार | Updated: July 13, 2023 19:09 IST2023-07-13T19:09:13+5:302023-07-13T19:09:30+5:30
Nagpur News वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचा शासकीय कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणाची तपासणी केली असता तब्बल १३ टक्के कर्मचारी लठ्ठ तर, ३९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाचा वाटेवर असल्याचे आढळून आले.

वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचे १३ टक्के कर्मचारी आहेत 'वजनदार'
सुमेध वाघमारे
नागपूर : इंदिरा गांधी शासीकय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्यावतीने (मेयो) ‘स्थूलपणा नियंत्रण व उपचार’ अभियानांतर्गंत वनविभाग, बीएसएनएल व एजी ऑफिसचा शासकीय कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणाची तपासणी केली असता तब्बल १३ टक्के कर्मचारी लठ्ठ तर, ३९ टक्के कर्मचारी लठ्ठपणाचा वाटेवर असल्याचे आढळून आले.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्यावतीने या अभियानांतर्गत मेयोचे अधिष्ठाता डॉ. संजय बीजवे यांच्या मार्गदर्शनात वनविभाग कार्यालय व ‘बीएसएनएल’ व महालेखाकारकार्यालय (एजी ऑफीस) या शासकीय कार्यालयांमध्ये २० ते २३जून रोजी लठ्ठपणा जागृती व निदान व तसेच रक्तदाब व मधुमेह निदान शिबिर आयोजित केले होते. त्याचा धक्कादायक अहवाल आता प्राप्त झाला आहे. मेयोने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही कार्यालयाचे मिळून एकूण २९१ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात १३ टक्के म्हणजे, २८ कर्मचारी लठ्ठ आढळून आले. ३९ टक्के म्हणजे, ११५ कर्मचाऱ्यांची लठ्ठपणाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून आले. अपेक्षेपेक्षा कमी वजनाचे २ कर्मचाऱ्यांचीही नोंद झाली.
- कर्मचाऱ्यांमध्ये वाढतोय मधुमेह
या अभियानांतर्गंत कर्मचाऱ्यांची मधुमेह व रक्तदाबाचीही तपासणी करण्यात आली. यात १३.४ टक्के म्हणजे ३९ कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेहाचे निदान झाले. शिवाय, ९.२५ टक्के म्हणजे २७ कर्मचाऱ्यांना उच्चरक्तदाब असल्याचे आढळून आले.