८१ तासांत १२०० किमी सायकल प्रवास!
By Admin | Updated: March 2, 2017 22:06 IST2017-03-02T21:50:02+5:302017-03-02T22:06:02+5:30
नागपूरचे अनिरुद्ध, विकास यांची यशस्वी कामगिरी नागपूर: मध्य भारतात सायकल चालविण्याच्या परंपरेत मानाचा तुरा रोवताना विकास पात्रा आणि अनिरुद्ध या ‘नागपूर रँडोनियर्स’च्या

८१ तासांत १२०० किमी सायकल प्रवास!
>ऑनलाइन लोकमत
ब्रेव्हेट, दि. 02 - मध्य भारतात सायकल चालविण्याच्या परंपरेत मानाचा तुरा रोवताना विकास पात्रा आणि अनिरुद्ध या ‘नागपूर रँडोनियर्स’च्या सदस्यांनी मंगळवारी १२०० किमी सायकल ब्रेव्हेट यशस्वीरीत्या पूर्ण केली. अशी कामगिरी करणारी या विभागातील ही पहिलीच जोडी आहे.
दिल्ली रँडोनियर्सने या ब्रेव्हटचे आयोजन केले होते. शनिवारी पहाटे ५ वाजता सुरू झालेली ही शर्यत मंगळवारी संपली. दिल्ली-उदयपूर-दिल्ली असा प्रवास ९० तासांत पूर्ण करायचा होता. विकास आणि अनिरुद्ध यांनी ८१ तासात हे अंतर गाठले. दोघांनी ४७ तास ३७ मिनिटे पहाटेच्या वेळी प्रवास केला.
सायकलिंगचा सरासरी वेग प्रतिताशी २५.४ किमी असा होता. लांब पल्ल्याच्या सायकलिंगला ब्रेव्हेट संबोधले जाते. आॅडकक्स पॅरिसशी संलग्न असलेल्या आॅडक्स इंडियातर्फे हे आयोजन होत असून २०० किमीसाठी १३.५ तास, ३०० किमीसाठी २० तास, ४०० किमीसाठी २७ तास, ६०० किमीसाठी ४० तास, एक हजार किमीसाठी ७५ तास आणि १२०० किमीसाठी ९० तास अशी वेळ निर्धारित करण्यात येते.
त्रिमूर्तीनगरच्या ‘एनसायक्लोपीडिया’ या आंतरराष्टÑीय सायकल शॉपचे मालक असलेल्या अनिरुद्धने या मोहिमेत संवादासाठी बाईकचे सहकार्य घेतले. अनिरुद्ध आणि आयटी तज्ज्ञ असलेला विकास हे दैनंदिन व्यवहारात सायकलला प्राधान्य देतात. अनिरुद्धने गेली दोन वर्षे सुपर रँडोनियर्स (कॅलेंडर वर्षांत २००, ३००, ४०० आणि ६०० किमी प्रवास पूर्ण करणारे) होण्याचा मान संपादन केला असून विकासदेखील यंदा सुपर रँडोनियस बनण्याच्या वाटेवर आहे.
१२०० किमीसाठी १३ स्पर्धकांनी नावे नोंदविली होती. त्यातील प्रत्येकी दोन हैदराबाद आणि बेंगळुरू येथील स्पर्धक होते. दोन नागपूरचे तर उर्वरित स्पर्धक दिल्लीतील होते. एका महिलेसह दहा जणांनी वेळेत स्पर्धा पूर्ण केली. दोघे स्पर्धक सुरुवात करू शकले नाहीत तर एका स्पर्धकाने मध्येच स्पर्धा सोडून दिली. चौपदरी महामार्गावर भरधाव वाहनांशी स्पर्धा करीत या दोन्ही स्पर्धकांनी खाण्यापिण्याची तसेच झोपेची पर्वा न करता सरशी साधली हे विशेष.