नागपूर : पावसाच्या दृष्टीने जुलै महिना समाधानकारक ठरला. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात सरासरीपेक्षा सरप्लस पाऊस झाला आहे. महिन्यातील सरासरी २० दिवस पाऊस नाेंदविला गेला, ज्यातील आठ दिवस मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली. सरासरीच्या तुलनेत १२० टक्के अधिक पाऊस झाला आहे.
जून महिना विनापावसाने गेल्यानंतर जुलैची सुरुवातसुद्धा काहीशी निराशाजनक राहिली हाेती. दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाने राैद्र रूप धारन केले. ७ जुलैपासून पावसाने धुवांधार हजेरी लावली, ज्यामुळे नागपूर, भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली या पाचही जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली हाेती. चार दिवस संततधार पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. मात्र या जाेरदार हजेरीमुळे ५० ते ६० टक्के मागे असलेली सरासरी बराेबरीत आली. त्यापुढे १० ते १२ दिवस किरकाेळ सरी वगळता ढगांनी शांतता बाळगली. २२ जुलै पासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. विविध ठिकाणी हलका, मध्यम ते जाेरदार हजेरी लावत पावसाने सरासरी पार केली आहे.
विभागातील सहा जिल्ह्यात सामान्यपणे २६ जुलैपर्यंत ३६२.३ मि.मी. सरासरी पाऊस हाेताे. यावर्षी आतापर्यंत ४३८.२ मि.मी. म्हणजे १२० टक्के पाऊस झाला आहे. गाेंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १९ दिवस पावसाने हजेरी लावली. याशिवाय नागपूर व भंडाऱ्यात १६ दिवस, चंद्रपूर व गडचिराेलीत १८ दिवस आणि वर्धा जिल्ह्यात १७ दिवस पाऊस नाेंदविण्यात आला. यातील ८ व ९ जुलै, तसेच २३ ते २६ जुलै या काळात सर्वाधिक पावसाची नाेंद झाली आहे.
पश्चिम विदर्भातील अमरावती व अकाेला जिल्ह्यात सरासरीपेक्षा २१ आणि २० टक्के कमी पाऊस झाला आहे. वाशिमची सरासरी कमी आहे पण सामान्य आहे. यवतमाळ व बुलढाण्यात सरासरीएवढा पाऊस झाला आहे.
विभागात आतापर्यंत झालेला पाऊस (मि.मी. मध्ये)जिल्हा सामान्य पाऊस यावर्षी झालेला पाऊस टक्केनागपूर ३०४.४ ४१८.४ १३७.५वर्धा २७३.६ ३०६.९ ११२.२भंडारा ३८२.६ ४९३.६ १२९गाेंदिया ४१४.९ ५१९.६ १२५.२चंद्रपूर ३५७.२ ४१३.७ ११५.८गडचिराेली ४२७.९ ५३६.९ १२५.५
एकूण ३६२.३ ४३८.२ १२०.९