निर्मल ग्राम अभियानासाठी १२ कोटींचा निधी
By Admin | Updated: August 29, 2014 00:59 IST2014-08-29T00:59:38+5:302014-08-29T00:59:38+5:30
निर्मल ग्राम अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी ग्राम स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. शासनाकडून १२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

निर्मल ग्राम अभियानासाठी १२ कोटींचा निधी
जिल्हा परिषद : सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयाची कामे
नागपूर : निर्मल ग्राम अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यासाठी ग्राम स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. शासनाकडून १२ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. यातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरोघरी शौचालय व गावातील सांडपाणी व्यवस्थापनाची कामे हाती घेण्यात आली आहे.
केंद्र शासनाने अभियानाच्या धोरणात बदल केला आहे. सोबतच अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून वैयक्तिक शौचालय अनुदान ९१०० वरून १५००० करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून लवकरच या संदर्भात निर्देश प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)वासुदेव भांडारकर यांनी दिली.
नागपूर जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार ६१६ कुटुंब आहेत. यातील कुटुंब दारिद्र्यरेषेखाली १ लाख २६ हजार २६६ कुटुंबापैकी २२ हजार २६८ कुटुंबाकडे शौचालये नाही. तसेच २ लाख १३ हजार १३० कुटुंंब दारिद्र्यरेषेवरील आहेत. पैकी ३० हजार कुटुंबाकडे शौचालय नाही. हागणदारी मुक्तीसाठी विभागामार्फ त विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत.
शौचालय बांधकामासाठी लाभार्थीला ९१०० रुपयाचे अनुदान दिले जाते. आता यात वाढ करण्यात आल्याने योजनेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व गावे निर्मल ग्राम करण्यात येणार आहे. ही योजना राबविताना संपूर्ण ग्राम हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न आहे.
जिल्ह्याला वैयक्तिक शौचालयासोबतच सार्वजनिक शौचालायाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी पंचायत विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती भांडारकर यांनी दिली. (प्रतिनिधी)