शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 19:39 IST2022-10-20T19:38:34+5:302022-10-20T19:39:10+5:30
Nagpur News शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर जास्त दराने परतावा देण्याचे आमिष दाखवत इम्पेरिअर वर्ल्ड कंपनीच्या मालकाने दोन जणांची ११ लाख ४५ हजाराने फसवणूक केली.

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत ११.४५ लाखांची फसवणूक
नागपूर : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यावर जास्त दराने परतावा देण्याचे आमिष दाखवत इम्पेरिअर वर्ल्ड कंपनीच्या मालकाने दोन जणांची ११ लाख ४५ हजाराने फसवणूक केली. बजाजनगर पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.
लोकेश अशोक देवतळे (३४, परसोडी) हा इम्पेरिअर वर्ल्ड कंपनीचा मालक असून, बजाजनगर येथे त्याचे कार्यालय आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने रोहन डोंगरे (३६, हुडकेश्वर मार्ग) यांच्याशी संपर्क केला व गुंतवणूक करण्यास सांगितले. माझी कंपनी एसबीआय व आरबीआयच्या नियमानुसार काम करत असून, गुंतवणूक केल्यास १२ ते १८ टक्के दराने परतावा मिळेल, असा दावा त्याने केला. डोंगरे यांनी देवतळेवर विश्वास ठेवला व त्याला १० लाख २५ हजार रुपये दिले. डोंगरेचा मित्र मंगेश मदनेकडूनदेखील त्याने १ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, देवतळेने दोघांनाही कुठलाही परतावा दिला नाही. दोघांनीही रक्कम परत मागितली असता तो टाळाटाळ करायला लागला. अखेर डोंगरे यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देवतळेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आणखी लोकांचीही फसवणूक ?
दरम्यान, देवतळे याने या पद्धतीने आणखी काही लोकांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता आहे. या दिशेने पोलीस तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.