मनपाच्या उपविभागीय अभियंत्याला ११ हजारांचा दंड
By Admin | Updated: April 9, 2016 03:04 IST2016-04-09T03:04:37+5:302016-04-09T03:04:37+5:30
महापालिके च्या आशीनगर झोनचे उपविभागीय अभियंता अनिलकुमार नागदिवे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब

मनपाच्या उपविभागीय अभियंत्याला ११ हजारांचा दंड
माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब
नागपूर : महापालिके च्या आशीनगर झोनचे उपविभागीय अभियंता अनिलकुमार नागदिवे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब केल्याने,राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी त्यांना ११,७५० रुपयांचा दंड (शास्ती)ठोठावला आहे.
जरीपटका येथील भाऊ साहेब भालेराव यांनी जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिलकुमार नागदिवे यांच्याकडे २१ आॅगस्ट २०१४ रोजी माहिती अर्ज सादर केला होता.
परंतु नागदिवे यांच्याकडून माहिती न मिळाल्याने भालेराव यांनी महापालिकेचे अपिलीय अधिकारी तथा नगरयंत्री यांच्याकडे अपील केले. त्यानंतर त्यांनी दुसरे अपील आयोगाकडे केले होते.
जन माहिती अधिकाऱ्यांनी अपीलार्थीच्या अर्जावर विहित मुदतीत माहिती उपलब्ध केलेली नाही. ही बाब गंभीर असून माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करणारी आहे. अर्जात मागितल्यानुसार अर्जदाराला माहिती देणे आवश्यक असते अथवा माहिती उपलब्ध नसल्यास तसे लेखी पत्र देणे गरजेचे होते. नियमानुसार मागितलेली माहिती संबंधित कार्यालयाशी संबंधित नसेल तर, प्राप्त अर्ज संबंधित विभागाकडे पाठवून अर्जदाराला माहिती पुरवावी लागते. परंतु नागदिवे यांनी माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब लावला. त्यामुळे प्रतिदिन २५० रुपयाप्रमाणे ११,७५० रुपयांचा दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करून याबाबतचा खुलासा आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागदिवे यांनी आयोगाकडे खुलासा केला होता. परंतु जन माहिती अधिकारी यांनी विहित मुदतीत माहिती उपलब्ध केली नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले.
त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन ही बाब गंभीर आहे. माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा र्भग करणारी असल्याने नागदिवे यांना दंड ठोठावण्यात आला.
ही रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करून शासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)