१0७ परिचारिकांच्या बदल्या

By Admin | Updated: May 26, 2014 01:02 IST2014-05-26T01:02:35+5:302014-05-26T01:02:35+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे, मात्र त्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी असल्याने

107 nurse transfers | १0७ परिचारिकांच्या बदल्या

१0७ परिचारिकांच्या बदल्या

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) येणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे, मात्र त्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी असल्याने रु ग्णांची सेवा-शुश्रूषा करण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याचे नेहमीचे दृश्य आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही रुग्णालयात परिचारिकांचा अनुशेष दूर करण्यासाठी मेयोमध्ये २१३ तर मेडिकलमध्ये १३५ परिचारिकांची नुकतीच पदभरती करण्यात आली, परंतु परिचारिकांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच यातील १0७ परिचारिकांची बदली पुणे, मुंबईला करण्यात आल्याने, समस्या कायम आहे.

शैक्षणिक संस्था असलेल्या रु ग्णालयांमध्ये तीन रु ग्णांमागे एक, तर अशैक्षणिक रु ग्णालयांमध्ये पाच रु ग्णांमागे एक परिचारिका असावी, असे इंडियन नर्सिंग कौन्सिलचे निकष आहेत. परंतु, या निकषाला डावलून ४0 रु ग्ण भरती असलेल्या वॉर्डात केवळ एक किंवा दोन परिचारिका सेवा देत आहेत. मेडिकलमध्ये ९३५ परिचारिकांची पदे मंजुर आहेत. यातील १३0 पदे अद्यापही भरलेली नाहीत. मेयोमध्ये ४२४ परिचारिकांची पदे मंजूर असून यातील ५४ पदे रिक्त आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, रिक्त पदे भरण्यासाठी नर्सिंग असोसिएशनने वेळोवेळी आंदोलन केले. अखेर सहा दशकानंतर निकषांच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. त्यानुसार मेडिकलमध्ये १३५, मेयोमध्ये २१३ तर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ३0 परिचारिकांच्या जागा भरण्यात आल्या. परिचारिकांच्या संख्या वाढल्याने मेडिकल-मेयोतील मोडलेला रुग्णसेवेचा कणा ताठ होणार होता. परंतु नियुक्तीपत्र मिळाल्याच्या १५ दिवसांतच मेयोतील ८0, मेडिकलमधील २४ तर सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील तीन परिचारिकांच्या बदल्यांचे आदेश निघाले. खुद्द वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने हे आदेश दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

हे नियमांना डावलून असल्याचा आरोप नर्सिंग असोसिएशनचा आहे. दर दिवशी नवेनवे विभाग तयार होत असताना परिचारिकांच्या झालेल्या या बदल्या प्रत्यक्ष वॉर्डामध्ये रु ग्णसेवेचा धर्म निभावणार्‍या परिचारिकांवर अन्याय करणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 107 nurse transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.