१०४ आजारी;योजनेत उधारी
By Admin | Updated: March 1, 2016 02:41 IST2016-03-01T02:41:24+5:302016-03-01T02:41:24+5:30
तातडीने रक्त हवंय... तर १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा, अन् वाजवी दरात रक्त मिळवा,...

१०४ आजारी;योजनेत उधारी
ए, बी व एबी रक्त गटाचा तुटवडा : तातडीने नव्हे १२ तासानंतर मिळते रक्त
सुमेध वाघमारे नागपूर
तातडीने रक्त हवंय... तर १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा, अन् वाजवी दरात रक्त मिळवा, ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. परंतु रक्ताच्या तुटवड्यामुळे नागपुरात ही योजना संकटात सापडली आहे. कोणत्याही निगेटिह गटाचे रक्त मिळतच नाही. साधे ‘ए’, ‘बी’, व ‘एबी’ पॉझिटिव्ह गटाचेही रक्त मिळेनासे झाले आहे. या क्रमांकावर रक्ताची तातडीने मागणी केल्यास आता नाही, १०-१२ तासानंतर सांगू, असे उत्तर मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना (ब्लड आॅन कॉल) सुरू करण्यात आली. गरजू रुग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७ जानेवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १०४ क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर डागा रुग्णालयाच्या रक्तपेढीवर दूरध्वनी हस्तांतरित करण्यात येतो. त्यानंतर ४० कि.मी. किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण यांना तातडीने रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत १०४ क्रमांकाचा नागपुरात फार कमी वापर होत असतानाही रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आधीच येथे मर्यादित मनुष्यबळ त्यातही दिलेले मुनष्यबळ तोकडे, जागेची मर्यादा आणि कम्पोनंट सेप्रेटर यंत्राशिवाय ही योजना सुरू असल्याने या योजनेचा मुख्य उद्देशच मागे पडल्याचे चित्र आहे.
योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरड
डागा रक्तपेढीमध्ये २९ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पॉझिटिव्ह ‘ए’ गटात १६, ‘बी’ गटात सहा, ‘एबी’ गटात चार तर ‘ओ’ गटात ३१ रक्त पिशव्या तर निगेटिव्ह ‘ए’ गटात एक, ‘बी’ गटात शून्य, ‘एबी’ गटात एक तर ‘ओ’ गटात केवळ तीन रक्त पिशव्या उपलब्ध होत्या. रक्त पिशव्यांची ही संख्या लाजिरवाणी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच रक्तपेढीमधून डागा रुग्णालयातील रुग्णांनाही रक्त पुरविले जाते. यातीलच प्रत्येक गटातील पाच रक्त पिशव्या राखीव ठेवल्या जातात. परिणामी, या योजनेचा लाभ मिळत नसल्याची तर काही वेळेत मिळत नसल्याची ओरड होत आहे.
या रक्तपेढीत फार कमी रक्त जमा होते. यामुळे विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा नेहमीच पडलेला असतो. गेल्या काही दिवसांपासून या रक्तपेढीत ‘बी’ पॉझिटिव्ह गटाचे रक्तच नव्हते. परिणामी, सोमवारी मेडिकलच्या रक्तपेढीतून उधारीवर या गटाच्या पाच रक्त पिशव्या मागण्याची वेळ आली. त्या आल्यावर रविवारी ज्या रुग्णांनी मागणी केली होती त्यातील काहीच जणांना सोमवारी पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)
फोन आलेत १२३१, पुरवठा मात्र ८१८ रुग्णांनाच
२०१४ मध्ये ६०३ तर २०१५ मध्ये ६२८ असे एकूण १२३१ फोन येऊन विविध गटातील रक्ताची मागणी करण्यात आली. परंतु २०१४ मध्ये ३१३ तर २०१५ मध्ये ५०५ असा एकूण ८१८ रुग्णांनाच रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे.
योजना सुरळीत सुरू
रक्ताचा तुटवडा असला तरी रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, नागपूर आणि ४० किलोमीटरच्या परिसरातून अद्यापही हवी तशी मागणी नाही. यामुळे आहे त्या स्थितीत ही योजना सुरळीत सुरू आहे.
-डॉ. सतीश जयस्वाल
रक्त संक्रमण अधिकारी, १०४ क्रमांक योजना नागपूर