आॅगस्टअखेर होणार १०२ वा दीक्षांत समारंभ
By Admin | Updated: July 1, 2015 03:04 IST2015-07-01T03:04:17+5:302015-07-01T03:04:17+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त अखेर निघाला आहे.

आॅगस्टअखेर होणार १०२ वा दीक्षांत समारंभ
व्यवस्थापन परिषदेत निर्णय : विद्यार्थ्यांना लगेच मिळणार पदव्या
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०२ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. आॅगस्ट अखेरीस दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचा निर्णय मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. या दीक्षांत समारंभापासूनच विद्यार्थ्यांना तत्काळ पदव्या मिळणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा दीक्षांत समारंभ ऐतिहासिक राहणार आहे.
३१ आॅगस्टला विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांची मुदत संपणार आहे. त्याअगोदर १०२ वा दीक्षांत समारंभ घेण्यात यावा, हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. त्याला सर्वांनी एकमताने मान्यता दिली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मंजुरीनंतर निश्चित तारीख ठरविण्यात येईल. परंतु आॅगस्टच्या अखेरच्या आठवड्यात हा दीक्षांत समारंभ पार पडेल, असे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले. पदवीसाठी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ झाल्यावरदेखील वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते. परंतु यंदापासून ही प्रणाली बदलण्यात येईल. समारंभाच्या अगोदरच सर्वांच्या पदव्या तयार राहतील व समारंभ झाल्यावर तातडीने त्या महाविद्यालयांकडे पाठविण्यात येतील, असे ते म्हणाले.
‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी
दरम्यान, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठात ‘रोबोटिक्स’ अभ्यासक्रम सुरू करण्यास सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. ‘एबीबी’ कंपनीनेदेखील विद्यापीठाला सामंजस्य कराराचा मसुदा पाठविला असून येत्या काही दिवसांत विद्यापीठ व ‘एबीबी’तर्फे संयुक्त मसुदा तयार करण्यात येईल. यंदापासूनच ‘रोबोटिक्स टेक्नॉलॉजी’मध्ये पदव्युत्तर पदविका सुरू करण्यात येईल. ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’ व इतर अभ्यासक्रम पुढील वर्षीपासून सुरू होतील.